प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप: 'सरकार मराठा समाजाची फसवणूक करत आहे'
प्रकाश आंबेडकर म्हणाले, 'कुणबी प्रमाणपत्र देणारा जीआर कायद्याच्या विरोधात'..!
05 September, 2025
प्रकाश आंबेडकरांचा मराठा आरक्षणावर सरकारवर गंभीर आरोप
मुंबई दि.५(जरंडेश्वर समाचार): -वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणावरुन शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत काढलेला जीआर (शासन निर्णय) हा केवळ फसवणूक असून, त्या आधारावर मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, असे खळबळजनक विधान त्यांनी केले आहे.
कोर्टाच्या निकालाचा संदर्भ
आंबेडकर यांनी आपल्या विधानाला मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा आधार दिला. ते म्हणाले, उच्च न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्टपणे नमूद केले आहे की, ‘सर्व मराठा कुणबी आहेत असे सरसकट म्हणता येणार नाही’ आणि ‘कुणबी ही जात नसून तो एक व्यवसाय आहे’. त्यामुळे, सरकारने काढलेला जीआर कायद्याच्या विरोधात आहे, असे आंबेडकरांनी म्हटले आहे. त्यांनी असाही आरोप केला की, सरकारने मराठा समाजासह, जरांगे पाटील आणि इतर सर्व उपसमित्यांची फसवणूक केली आहे.
स्वतंत्र आरक्षणाची भूमिका
यावेळी त्यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात वंचित बहुजन आघाडीची जुनी भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. ते म्हणाले, "मराठा आरक्षणाचे ताट वेगळे आणि ओबीसी आरक्षणाचे ताट वेगळे असले पाहिजे. मराठा समाजाला जर आरक्षण हवे असेल, तर त्यांना स्वतंत्रपणे आरक्षणाची मागणी करावी लागेल." ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
भाजपवर निशाणा
आंबेडकरांनी भाजपवरही जोरदार टीका केली. ‘भाजपने असा आव आणला की न सुटणारा प्रश्न त्यांनी सोडवला आहे, पण प्रत्यक्षात त्यांनी मराठा समाजाला धोका दिला आहे,’ असा आरोप त्यांनी केला. या जीआरच्या माध्यमातून भाजप, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व राजकीय पक्षांची फसवणूक करत असल्याचेही ते म्हणाले..!