single-post

बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाची बातमी सांगणारे ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते दामू मोरे यांचे निधन

‘बाबासाहेब गेले...’ हे शब्द रिक्षातून सांगणारा आवाज कायमचा शांत;देहदान करून दामू मोरे यांनी दिला शेवटचा प्रेरणादायी संदेश

05 September, 2025

नागपूर (जरंडेश्वर समाचार):-महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणाची हृदयद्रावक बातमी नागपूरच्या रस्त्यांवर रिक्षातून फिरून लोकांपर्यंत पोहोचवणारे ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते दामू मोरे (वय ९२) यांची प्राणज्योत सोमवारी मालवली. मृत्यूपूर्वी त्यांनी केलेल्या संकल्पानुसार त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे मेडिकलला देहदान केले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि मोठा आप्त परिवार आहे.

बालवयात घेतलेली ऐतिहासिक जबाबदारी,दामू मोरे यांचा जन्म आंबेडकरी कुटुंबात झाला. त्यांच्या घरातील ‘साऊंड सर्व्हिस’चा व्यवसाय त्या काळी नागपूरमध्ये चांगलाच प्रसिद्ध होता. ६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाची बातमी मिळताच घरातील ज्येष्ठांनी स्वतःचा शोक बाजूला ठेवून ही बातमी जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी केवळ १२ वर्षांच्या दामूवर सोपवली.

त्या दिवशी छोटा दामू हातात माईक घेऊन रिक्षातून नागपूरच्या गल्लीबोळांमध्ये फिरत होता. "बाबासाहेब गेले" ही वाक्ये त्याच्या ओठांवरून निघताच लोकांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. काहींना विश्वास बसत नव्हता, काही जणांनी त्याच्यावर रागाने ओरडले, तर काहींनी दु:खाने धाव घेतली. पण त्या बालकाच्या आवाजामागे केवळ एक पोरगं नव्हतं, तर एक जबाबदारी, एक सत्य आणि संपूर्ण समाजाच्या मनात कोरलेली असीम वेदना होती.

आयुष्यभर जपली आठवण,दामू मोरे ही आठवण आयुष्यभर जपून ठेवत असत. ते नेहमी सांगायचे की त्या दिवशी त्यांनी लोकांच्या डोळ्यांत उमटलेलं दु:ख कधीही विसरता आलं नाही. त्यांची ही घटना आंबेडकरी चळवळीच्या इतिहासात अमिट ठसा उमटवणारी ठरली.

देहदान करून दिला प्रेरणेचा संदेश,दामू मोरे यांनी आयुष्याच्या उत्तरार्धात देहदानाचा संकल्प केला होता. त्यांच्या निधनानंतर सोमवारी त्यांच्या कुटुंबीयांनी हा संकल्प पूर्ण करत मेडिकलमध्ये त्यांचे देहदान केले. त्यांच्या या निर्णयामुळे समाजासमोर त्यांनी पुन्हा एकदा प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे.

ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या निधनाने कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. नागपूरच्या सामाजिक व आंबेडकरी वर्तुळात त्यांच्या कार्याची आणि योगदानाची आजही मोठ्या आदराने आठवण काढली जाते.