भूमीअभिलेख विभागातील भ्रष्टाचाराविरोधात बसप आक्रमक:
महिनाभरात सुधारणा करा, अन्यथा बसपा स्टाईल आंदोलन - डॉ. चलवादी
05 September, 2025
पुणे, दि. ५ (जरंडेश्वर समाचार): - विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात भूमीअभिलेख विभागातील भ्रष्टाचार, दलालशाही आणि अनागोंदी कारभाराला कंटाळलेल्या नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी बहुजन समाज पार्टीने (बसप) आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र झोनचे प्रभारी डॉ. हुलगेश चलवादी यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे की, "जर महिनाभरात या विभागातील कारभारात सुधारणा झाली नाही, तर भूमीअभिलेख कार्यालयाला घेराव घालून 'बसपा स्टाईल' आंदोलन छेडले जाईल."
असंख्य तक्रारी, गंभीर आरोप
डॉ. चलवादी यांनी भूमीअभिलेख विभागावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, जमिनीची मोजणी, प्रॉपर्टी कार्ड, म्युटेशन एंट्री यांसारख्या कामांसाठी नागरिकांना अधिकाऱ्यांना दलालांमार्फत चिरीमिरी द्यावी लागते. चुकीच्या मोजण्या, नकाशातील त्रुटी आणि डुप्लिकेट दाखले देण्याचे सत्र सुरू आहे. प्रॉपर्टी कार्ड आणि म्युटेशन एंट्रीमध्ये सतत चुका होतात. सर्वात धक्कादायक म्हणजे, अपील केवळ पैशांच्या जोरावर निकाली काढली जातात, गुणवत्तेला येथे कोणताही थारा नाही, असा आरोप त्यांनी केला.
नागरिकांचे हाल आणि अनधिकृत बांधकामे
चुकीच्या सर्वेक्षणामुळे अनेक घरांना बेकायदेशीर ठरवून नागरिकांना त्रास दिला जात असल्याचा आरोपही डॉ. चलवादी यांनी केला. जमिनीच्या सीमारेषांबाबत योग्य मोजणी न झाल्याने नागरिकांची फसवणूक होत आहे, तर प्रमाणपत्र मिळवण्यासाठी महिनोन्महिने वाट पाहावी लागते. या भोंगळ कारभारामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए हद्दीतील नागरिक इच्छा असूनही नकाशा मंजूर करू शकत नाहीत, ज्यामुळे त्यांना नाईलाजास्तव अनधिकृत बांधकामे करावी लागत आहेत, असेही त्यांनी निदर्शनास आणले.
डॉ. चलवादीं यांच्या प्रमुख मागण्या प्रकरणी तातडीने लक्ष घालण्याची मागणी करताना, डॉ. चलवादी यांनी प्रशासनाला काही सूचना केल्या आहेतजबाबदार अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक आणि टोल फ्री नंबर जाहीर करण्यात यावे,नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ सुनावणी होऊन त्या मार्गी लावण्यात याव्यात,दलालशाही आणि भ्रष्टाचार थांबवण्यासाठी कठोर कारवाई करण्यात यावे.