single-post

“सर्वपक्षीय बैठक बोलवा, तातडीने निर्णय घ्या” – सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रींकडे मागणी

सुप्रिया सुळे यांच्या गाडीला आंदोलकांचा घेराव; शरद पवारांविरोधात घोषणाबाजी;मराठा आरक्षण आंदोलनाचा तिसरा दिवस; आझाद मैदानात तणाव

31 August, 2025

सुरक्षेच्या ताफ्याने दिला मार्ग, सुप्रिया सुळे सुरक्षित बाहेर

सुप्रिया सुळे यांच्या गाडीला आंदोलकांचा घेराव; शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी

मुंबई, दि.३१ (जरंडेश्वर समाचार सेवा):– मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू केलेल्या आंदोलनाला आज तिसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाचा पाठिंबा मिळाला. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देऊन जरांगे पाटील यांची तब्येत विचारली. मात्र, भेटीनंतर परत जाताना त्यांच्या गाडीला आंदोलकांनी आडवे घालत शरद पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

गाडी आडवून घोषणाबाजी

सुप्रिया सुळे आंदोलनस्थळावरून निघत असताना मोठ्या संख्येने जमलेल्या आंदोलकांनी त्यांच्या गाडीला घेराव घालून गाडी पुढे जाऊ दिली नाही. यावेळी शरद पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली. काही वृत्तवाहिन्यांवर दाखवलेल्या दृश्यांमध्ये आंदोलक संतप्त झाल्याचे आणि पाण्याची बाटली गाडीच्या दिशेने फिरकवण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसले. परिस्थिती तणावपूर्ण होत असतानाच सुरक्षा रक्षकांनी गाडीला मार्ग करून दिला आणि सुळे सुरक्षितपणे रवाना झाल्या.

आंदोलनाचा तिसरा दिवस

मनोज जरांगे पाटील गेल्या तीन दिवसांपासून उपोषणावर असून त्यांच्या समर्थनार्थ राज्यभरातून लाखो मराठा समाज बांधव आझाद मैदानात जमले आहेत. आंदोलकांनी आरक्षणाच्या मागणीवर ठाम भूमिका घेतली आहे. वाढता जनसमुदाय, घोषणाबाजी आणि नेत्यांच्या भेटींमुळे आज आंदोलन स्थळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

आंदोलनाला भेट दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या,“मनोज जरांगे गेल्या चार दिवसांपासून उपोषण करत आहेत, त्यांना प्रचंड थकवा आला आहे. त्यांच्या विनंतीनुसार मुंबई महापालिका आयुक्तांना स्वच्छतेसाठी आणि लाईट्ससाठी विनंती करणार आहे.”

“आंदोलकांचा निरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणे ही आमची जबाबदारी आहे. माझी folded hands करून विनंती आहे की सर्वपक्षीय बैठक बोलवा. हवं तर एक दिवशीचं अधिवेशन घ्या आणि मराठा आरक्षणाबाबत तातडीने निर्णय घ्या.”

आंदोलनाचा राजकीय परीणाम

आझाद मैदानावर सुरू असलेल्या या आंदोलनाला राज्यातील विविध राजकीय पक्षांचे नेते भेट देत आहेत. मात्र, शरद पवार यांच्या विरोधात झालेली घोषणाबाजी आणि सुप्रिया सुळे यांच्या गाडीला अडवण्याच्या घटनेमुळे आंदोलनाला राजकीय वळण मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. आंदोलन स्थळावरील वातावरण तणावपूर्ण असले तरी आंदोलकांचा भर आरक्षणाबाबत तातडीचा निर्णय मिळविण्यावर आहे.