single-post

सुरूर ते कुंभरोशी महामार्गाच्या कामाला गती द्या – मंत्री मकरंद पाटील

वाईत चौपदरीकरण कामाची पाहणी; ठेकेदारावर कारवाईचा इशारा

31 August, 2025

सुरूर ते कुंभरोशी महामार्गाच्या कामाला गती द्या – मंत्री मकरंद पाटील

वाईत चौपदरीकरण कामाची पाहणी; ठेकेदारावर कारवाईचा इशारा

पर्यटनवाढीच्या दृष्टीने महत्त्वाचा रस्ता

वाई : वाई, पाचगणी व महाबळेश्वर या पर्यटनस्थळांना मुंबई-पुण्याहून लाखो पर्यटक भेट देतात. त्यांच्या सुविधेसाठी आणि दळणवळण सुलभ करण्यासाठी सुरूर ते कुंभरोशी या महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असून हे काम गतीमान करावे, अशा सूचना मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिल्या आहेत.

प्रकल्पाचा खर्च 293 कोटी रुपये

हा प्रकल्प HAM-2 योजनेतर्गत सुरू असून सुरूर – वाई – पाचगणी – महाबळेश्वर – कुंभरोशी असा एकूण साधारण 59 किलोमीटर रस्ता विकसित केला जात आहे. यासाठी अंदाजे 293 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार असून स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

संथ गतीमुळे व्यावसायिक त्रस्त

सध्या सुरू असलेले वाई ते सुरूर दरम्यानचे चौपदरीकरण काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे व्यावसायिक व प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावरील धोकादायक खड्ड्यांमुळे प्रवास त्रासदायक झाला आहे. या पार्श्वभूमीवर काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले.

ठेकेदारावर कारवाईचा इशारा

कामाची गती न वाढल्यास ठेकेदारावर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा मंत्री पाटील यांनी दिला. ठेकेदाराने चुकीच्या पद्धतीने रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे खोदून ठेवले असून 10 किलोमीटर अंतर प्रवास करणेही कठीण झाले आहे. याबाबत स्थानिक व्यापारी व नागरिकांनी तक्रारी मांडल्या.

पाहणीवेळी मान्यवर उपस्थित,सुरूर ते कुंभरोशी महामार्गाच्या कामाची पाहणी करताना एमएसआयडीसीचे कार्यकारी अभियंता श्री. नायकवडी, बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. गोंजरी, किसनवीर कारखान्याचे संचालक शशिकांत पिसाळ, शशिकांत पवार, सत्यजीत वीर, महादेव म्हस्कर, अशोक मांढरे तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.