single-post

मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचा विराट उद्रेक; सरकारवर प्रचंड दबाव

महाराष्ट्रातून जेवणाचे ट्रक मुंबईकडे; आंदोलकांसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ

31 August, 2025

महाराष्ट्रातून जेवणाचे ट्रक मुंबईकडे; आंदोलकांसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ

मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचा विराट उद्रेक; सरकारवर प्रचंड दबाव

मुंबई :(जरंडेश्वर समाचार वृत्तसेवा)आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला मोठा वेग मिळत असून , राज्य सरकार आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असल्याची शंका कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केली जात आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मागण्यांसाठी शुक्रवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले असून या आंदोलनात हजारोंच्या संख्येने मराठा समाजबांधव सहभागी होत आहेत.

पहिल्याच दिवशी आंदोलनकर्त्यांना जेवण, पाणी, शौचालय यांसारख्या मूलभूत सुविधांची मोठी गैरसोय झाली. त्यामुळे जरांगे पाटील यांनी सरकारवर आंदोलकांची कोंडी केल्याचा आरोप केला. त्यानंतर महापालिकेने तातडीने हालचाल करून काही सुविधा उपलब्ध केल्या. मात्र, पोलिसांनी पाच हजार लोकांसाठी परवानगी दिलेली असतानाही प्रत्यक्षात ३० ते ३५ हजारांचा जनसमुदाय जमल्याने आझाद मैदानातील व्यवस्था पूर्णपणे कोलमडली.

ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर समर्थन

या आंदोलनाला ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळत असून गावोगावी बैठकांचे आयोजन सुरू झाले आहे. येत्या काही दिवसांत महिलाही मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून जेवणाचे ट्रकदेखील मुंबईत पाठवले जात असून संपूर्ण शहरात आंदोलकांना अन्नपुरवठा करण्याची तयारी केली जात आहे.

सरकारवर दबाव वाढतोय

मोठ्या संख्येने जमलेला मराठा समाज आणि त्यांची ठाम भूमिका यामुळे राज्य सरकारवर प्रचंड दबाव वाढला आहे. भाजप सरकारसमोर यामुळे मोठे आव्हान उभे राहिले असून आगामी निवडणुकीत त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काही मराठा आमदारदेखील पक्षाविरोधात भूमिका घेतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुंबईत गर्दीचा उच्चांक

मुंबईतील वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंदोलकांचा ओघ सुरूच राहिल्याने स्थानिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. शहरात हालचाल करणेही कठीण होईल, असे चित्र निर्माण झाले आहे.

मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या आंदोलनाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून सरकारसमोर कठीण परिस्थिती उभी राहिली आहे. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन आगामी दिवसांत किती तीव्र होते आणि सरकार त्याला कशा पद्धतीने हाताळते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.