मराठा आरक्षणावरून सरकार वेळकाढूपणा करतंय: शशिकांत शिंदे यांचा हल्लाबोल
सरकार मराठा आणि ओबीसी समाजांत वाद लावत असल्याचा आरोप;मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका संदिग्ध: शशिकांत शिंदे यांची टीका
01 September, 2025
मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका संदिग्ध: शशिकांत शिंदे यांची टीका
सातारा(जरंडेश्वर समाचार): मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यायचे असेल तर राज्य सरकारने तशी स्पष्ट भूमिका घ्यावी, अन्यथा आरक्षण कसे देणार हे जाहीर करावे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली. उपसमितीच्या नावाखाली सरकार वेळकाढूपणा करत असून, मराठा आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही आ.शिंदे यांनी केला आहे.
सातारा येथील राष्ट्रवादी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील माने आणि सरचिटणीस राजकुमार पाटील यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. शिंदे म्हणाले की, मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारची भूमिका संदिग्ध आहे. आंदोलक मनोज जरांगे यांनी दोन महिन्यांपूर्वीच आंदोलनाची सूचना देऊनही सरकारने त्यांच्याशी चर्चा केली नाही.
सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
शिंदे यांनी सरकारला अनेक प्रश्न विचारले. त्यांनी म्हटले की, जर सरकार तामिळनाडू पॅटर्नप्रमाणे मराठा आरक्षणाचा कोटा वाढवणार असेल, तर त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला आहे का? ओबीसी कोट्यातून आरक्षण देणार असाल, तर तसे स्पष्ट सांगा. अन्यथा, स्वतंत्र घटनात्मक तरतूद काय आहे, हे तरी जाहीर करा. सरकार विरोधी पक्षांनाही चर्चेत सहभागी करून घेत नाही, ही दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
आंदोलन दडपण्याचा प्रयत्न
आंदोलकांना मुंबईत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी मुंबईकडे जाणारे प्रमुख रस्ते रोखण्यात आले आहेत. यामुळे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. जसजसे दिवस जातील तसतसे आंदोलकांच्या भावना अधिक तीव्र होतील. सरकार मराठा आणि ओबीसी समाजात वाद लावत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दोन वर्षांपूर्वीच आंदोलकांनी घेतलेल्या भूमिकेवर सरकारने अभ्यास केला असता तर ही परिस्थिती उद्भवली नसती, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
जनसुरक्षा कायद्याविरोधात आंदोलन
या पत्रकार परिषदेत शिंदे यांनी आगामी आंदोलनांचीही माहिती दिली. आगामी १० सप्टेंबर रोजी जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने राज्यभर आंदोलने केली जातील. या कायद्याच्या विधेयकाची ठिकठिकाणी होळी केली जाईल. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करून पक्षाचे कार्यकर्ते आपला विरोध दर्शवतील. तसेच, १४ व १५ सप्टेंबर रोजी पक्षाचे विशेष अधिवेशन नाशिक येथे होणार असून, त्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि आर्थिक अडचणींवर चर्चा केली जाईल. या अधिवेशनानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नाशिकमध्ये मोठा मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला.