single-post

साताऱ्यात आयटी पार्कसाठी लिंबखिंड-नागेवाडी येथे ४६ हेक्टर जागेचे ड्रोन सर्वेक्षण

साताऱ्यात आयटी पार्क उभारणीसाठी मोठे पाऊल – महामार्गालगत जागेची पाहणी;उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्याला यश – साताऱ्यात आयटी पार्कचा मार्ग मोकळा

30 August, 2025

साताऱ्यात आयटी पार्कसाठी लिंबखिंड व नागेवाडी येथे ४६ हेक्टर शासकीय जागेचे ड्रोन सर्वेक्षण

सातारा दि. २९ (जरंडेश्वर समाचार):-साताऱ्यात आयटी पार्क उभारणीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, पुणे–बंगळूर महामार्गालगत लिंबखिंड व नागेवाडी येथील तब्बल ४६ हेक्टर शासकीय जागेचे ड्रोन सर्वेक्षण शुक्रवारी करण्यात आले. सातारा औद्योगिक महामंडळाच्या वतीने हे सर्वेक्षण सुमारे दीड तास सुरू होते.

जिल्हा प्रशासनाकडून हस्तांतरण प्रक्रिया सुरू

सुरुवातीला या परिसरातील ११३ एकर शासकीय जागा जिल्हा प्रशासनाकडून शासकीय औद्योगिक वसाहतीकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या सर्व प्रक्रियेनंतर आयटी पार्कसाठी जागेचे अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांचा पाठपुरावा

साताऱ्यात आयटी पार्क उभारण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. चार महिन्यांपूर्वीच शिवेंद्रसिंहराजे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे लिंबखिंड व नागेवाडी येथील शासकीय जमिनींच्या सर्वेक्षणाचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार शुक्रवारी प्रत्यक्ष ड्रोन सर्वेक्षण करण्यात आले.

सर्वेक्षणाची प्रमुख वैशिष्ट्ये

ड्रोन सर्वेक्षणात –

उपलब्ध जमीन व तिचे गट क्रमांक,

हद्द निश्चिती,

जमिनीकडे जाणारे पर्यायी मार्ग,

पायाभूत सुविधा उभारणीसाठी उपयुक्त बाबींचा अभ्यास करण्यात आला.


शिवेंद्रसिंहराजे यांची माहिती

“साताऱ्यात आयटी पार्कसाठी आवश्यक शासकीय प्रक्रिया सुरू असून, लवकरच अधिसूचना जाहीर होईल. या प्रकल्पात कन्व्हेन्शन सेंटरचाही समावेश असेल. साताऱ्यातील नागरिकांना कार्यक्रमांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे. आयटी पार्कसाठी पाणी, वीज, रस्ते व इतर पायाभूत सुविधांसाठी सूचना दिल्या आहेत,” असे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.

साताऱ्याच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा

सातारा हे पुण्यापासून फक्त दीड तासांच्या अंतरावर असल्याने येथील आयटी पार्क उद्योगांसाठी आकर्षक ठरणार आहे. या प्रकल्पामुळे तंत्रस्नेही विद्यार्थ्यांना व स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.