आझाद मैदानावर लाखोंचा जमाव;मराठा आरक्षणासाठी मुंबईत मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू; पुन्हा आंदोलन पेटले..!
गोळ्या घालाल तरी मागे हटणार नाही!तुरुंगात टाकाल तरी उपोषण सुरू ठेवणार
29 August, 2025
मुंबईत मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू
मुंबई दि.२९(जरंडेश्वर समाचार): मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज शुक्रवार दि.२९ ऑगस्ट 2025 पासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे. मराठा समाजाला जोपर्यंत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले जात नाही, तोपर्यंत आपण हे उपोषण मागे घेणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही आणि तुरुंगात टाकले तरी तिथेही उपोषण करू, असा थेट इशाराही जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.
लाखो मराठा बांधव जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानावर जमले आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्ध पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आपल्या उपोषणाची सुरुवात केली. यावेळी बोलताना जरांगे पाटील यांनी सरकारवर टीका केली. 'सरकार वेळकाढूपणा करत आहे. आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकार गंभीर नाही,' असा आरोप त्यांनी केला.
जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी याआधीही अनेक आंदोलने केली आहेत. सरकारने मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याची घोषणा केली असली, तरी जरांगे पाटील आणि मराठा समाज त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे सरकारने यावर त्वरित निर्णय घ्यावा, अशी त्यांची मागणी आहे. या उपोषणाला राज्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित आहेत. जोपर्यंत सरकार ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.