single-post

मराठा समाजातून उद्योजक निर्मितीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे योगदान-✍️ वर्षा पाटोळे,जिल्हा माहिती अधिकारी, सातारा

सरकारचा अभिनव उपक्रम : युवकांसाठी रोजगारनिर्मितीचे नवे दालन समाजातील उद्योजक घडविण्यात अण्णासाहेब पाटील महामंडळाचा मोठा वाटा

30 August, 2025

मराठा समाजातून उद्योजक निर्मितीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे योगदान

महाराष्ट्रात आर्थिकदृष्ट्या मागास घटकांची संख्या मोठी आहे. या समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज होती. याच उद्देशाने स्थापन झालेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने मराठा समाजातील युवकांना उद्योजकतेच्या प्रवाहात आणण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.

महामंडळाची स्थापना आणि पुनरुज्जीवन

राज्यातील दुर्बल घटकांना सक्षम करण्यासाठी या महामंडळाची स्थापना झाली. मात्र २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामंडळाला नवे बळ दिले. कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची अध्यक्षपदी नियुक्ती करून पदाला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला. त्यांच्या नेतृत्वाखाली महामंडळाने मराठा समाजातील युवकांसाठी विविध योजना राबवून उद्योजक निर्मितीचे केंद्र बनण्याचा मार्ग धरला.

आजपर्यंतच्या कार्यकाळात या महामंडळाने सुमारे एक लाख युवकांना स्वावलंबी उद्योजक बनवले आहे. या योजनांची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होत असून पारदर्शकता हेच या यंत्रणेचे वैशिष्ट्य ठरले आहे.

योजनांची मुख्य वैशिष्ट्ये

महामंडळाच्या योजनांसाठी काही सामाईक अटी घालण्यात आल्या आहेत. उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक असून वयोमर्यादा कमाल ६० वर्षे आहे. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपर्यंत असावे. तसेच केवळ व्यवसाय आणि उद्योगासाठी घेतलेल्या कर्जावरच व्याज परतावा दिला जातो.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-I)

या योजनेत १० लाखांपासून १५ लाखांपर्यंतचे कर्ज घेता येते. व्याजाचा दर कमाल १२ टक्के असून सात वर्षांपर्यंत व्याज परतावा मिळतो.

गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना (IR-II)

या योजनेत दोन किंवा अधिक जणांचा गट एकत्र येऊन कर्ज घेऊ शकतो. पाच किंवा अधिक जणांनी गट तयार केल्यास ५० लाखांपर्यंत कर्जाची मर्यादा आहे. कर्जाच्या व्याजावर पाच वर्षे अथवा कर्ज कालावधी, यापैकी जे कमी असेल त्यापर्यंत १२ टक्क्यांपर्यंत व्याज परतावा मिळतो. शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO) देखील या योजनेस पात्र आहेत.

पारदर्शक कार्यपद्धती

लाभार्थ्यांना प्रथम LOI (Letter of Intent) घेणे आवश्यक असते. त्यानंतर प्रकल्प अहवालासह बँकेत कर्जप्रकरण दाखल करावे लागते. कर्ज मंजूर झाल्यावर संपूर्ण माहिती ऑनलाईन अपलोड करणे बंधनकारक आहे. लाभार्थी वेळेत हप्ते भरल्यानंतरच व्याज परतावा त्यांच्या खात्यात जमा होतो.

सिव्हिल स्कोअरचे महत्व

कर्जप्रक्रियेत सिबिल स्कोअर हा अत्यंत महत्वाचा घटक मानला जातो. हा स्कोअर ३०० ते ९०० दरम्यान असतो. ७५० किंवा त्याहून अधिक स्कोअर उत्तम समजला जातो. कर्ज किंवा क्रेडिट कार्ड हप्ते वेळेवर भरल्यास सिबिल स्कोअर सुधारतो. मर्यादित खर्च, वेळेवर देयके आणि नियमित तपासणी यामुळे स्कोअर मजबूत ठेवता येतो.

मराठा समाजातील युवकांना रोजगार, स्वावलंबन आणि उद्योजकतेचे नवे क्षितिज दाखविण्याचे कार्य अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने यशस्वीरीत्या पार पाडले आहे. पारदर्शकता, ऑनलाईन प्रणाली आणि युवकाभिमुख योजना या माध्यमातून समाजातील हजारो तरुणांनी व्यवसाय उभारला आहे. समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि स्वाभिमान वाढविण्यासाठी या योजनांचे योगदान निश्चितच मोलाचे आहे.

✍️ वर्षा पाटोळे,जिल्हा माहिती अधिकारी, सातारा