single-post

महाबळेश्वरमध्ये शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक: विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची रुजवात

महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश पाटील म्हणाले,

29 August, 2025

महाबळेश्वरमध्ये शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक: विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची रुजवात

महाबळेश्वर, दि. २9,(जरंडेश्वर समाचार): लोकशाही आणि मतदानाच्या अधिकाराचे महत्त्व विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच कळावे, यासाठी महाबळेश्वर येथील पीएमश्री नगरपालिका मुलींची शाळा क्र. २ मध्ये नुकतीच शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक पार पडली. या अनोख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला.

​या उपक्रमाचे कौतुक करताना महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश पाटील म्हणाले, "हा उपक्रम भावी पिढीला जबाबदार आणि सुजाण नागरिक बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. इतर शाळांनीही असा आदर्श घ्यावा."

मतदान प्रक्रिया आणि उमेदवारांची निवड

​शालेय निवडणुकीची प्रक्रिया २२ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट या कालावधीत राबवण्यात आली. उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते मतमोजणीपर्यंत सर्व टप्प्यांचे पालन करण्यात आले. यामध्ये उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करणे, निवडणूक चिन्हे वाटप करणे आणि प्रचाराचा समावेश होता. मतपत्रिका, मतदार यादी, मतदार नोंदवही आणि मतदान कक्ष अशा सर्व व्यवस्था करण्यात आल्या होत्या.

​या निवडणुकीत इयत्ता चौथी आणि पाचवीमधील एकूण १३ विद्यार्थिनींनी मुख्यमंत्रीपदासाठी निवडणूक लढवली. मंगळवार, २६ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत मतदान पार पडले.

मतदान आणि निकाल

​शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थिनींसह प्रशासक, मुख्याधिकारी योगेश पाटील, नायब तहसीलदार शेख, केंद्रप्रमुख नामदेव धनावडे, नगरपालिका मुख्य लिपिक आबाजी ढोबळे आणि शिक्षकवृंद यांनीही मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणी मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या उपस्थितीत झाली.

​या निवडणुकीत कु. जुई डोईफोडे सर्वाधिक मते मिळवून मुख्यमंत्री म्हणून निवडून आली. तर कु. संस्कृती चोरगे हिने दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवून उपमुख्यमंत्रिपद पटकावले. संगीता ढेबे, दीप्ती ढेबे, मनीषा कुरुंदे आणि कु. आरती ढेबे यांनी मतदान अधिकारी म्हणून काम पाहिले.

​हा यशस्वी उपक्रम राबवण्यासाठी मुख्याध्यापिका ज्योती काळे, लक्ष्मण महाडिक, संतोष शिंदे, कु. सलोनी यादव, आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ डोईफोडे यांनी विशेष परिश्रम घेतले.