single-post

‘आरक्षण आमच्या हक्काचं !’बावधनमधून शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना;

जरांगे पाटीलांच्या उपोषणाला बावधन तरूण युवकांचा भक्कम पाठिंबा;जरांगे पाटीलांच्या लढ्याला गावागावातून साथ; बावधनकर मैदानात सज्ज

28 August, 2025

मराठा आरक्षणासाठी बावधन तालुका वाई येथून शेकडो कार्यकर्त्यांचा मुंबईकडे मोर्चा; जरांगे पाटील यांच्या उपोषणाला भक्कम पाठिंबा

बावधन दि.२८ (प्रतिनिधी जरंडेश्वर समाचार) – मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर पेटलेली चळवळ अधिक तीव्र होत चालली आहे. या लढ्याला साथ देण्यासाठी बावधन तालुका वाई येथील नाना पिसाळ यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि युवकवर्ग मुंबईकडे रवाना झाले आहेत. मुंबईतील आजाद मैदानावर मराठा समाजाच्या हक्कासाठी श्री. मनोज जरांगे पाटील हे उपोषणास बसणार आहेत. त्यांना  पाठिंबा देण्यासाठी बावधन परिसरातून तरुण युवकां कडून उपस्थिती दाखवण्यात येत आहे.

मराठा समाजातील सामान्य, गरीब आणि शेतकरी कुटुंबातील तरुणांना शिक्षण व नोकरीच्या संधी मिळाव्यात यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता दिलेला लढा सर्व महाराष्ट्रासाठी प्रेरणादायक ठरत आहे. त्यांच्या या संघर्षाला समर्थन,साथ देण्यासाठी बावधन व आसपासच्या गावांतील तरुणांनी एकत्र येत मुंबईच्या दिशेने कूच केली आहे.

‘आरक्षण आमच्या हक्काचं आहे, देणार नसेल तर सरकार बदलू’ अशा जोरदार घोषणा देत हे कार्यकर्ते रवाना झाले. या आंदोलनात कुठलाही पक्षीय मतभेद न ठेवता संपूर्ण मराठा समाज एकवटलेला दिसून येत आहे.

नाना पिसाळ यांच्या नेतृत्वाखालील तरुण युवकांची चीही लक्षणीय उपस्थिती असून, ‘आता आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही’ असा निर्धार या सर्वांनी व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे, मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात आणि मराठा समाजाला न्याय मिळावा, यासाठी राज्य सरकारवर दबाव वाढत चालला आहे.

बावधन परिसरातील ग्रामस्थांनी या आंदोलनासाठी आपल्या व्यावसायिक व वैयक्तिक कामे बंद करून आंदोलनात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही केवळ मागणी नसून हक्काची गोष्ट आहे’ असे मत या युवकांनी व्यक्त केले.

या पार्श्वभूमीवर मुंबईतील आजाद मैदानावर होणाऱ्या उपोषणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी नाना पिसाळ यांनी केली  आहे.