single-post

साताऱ्यात उभारले जात आहे आधुनिक वाहन तंदुरुस्त चाचणी केंद्र!

वाहन चाचणीत पारदर्शकता आणि अचूकता आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत

23 August, 2025

साताऱ्यात उभारले जात आहे आधुनिक वाहन तंदुरुस्त चाचणी केंद्र! वाहन चाचणीत पारदर्शकता आणि अचूकता आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत

सातारा (जरंडेश्वर समाचार):-रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहनांची तांत्रिक तंदुरुस्ती अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळेच महाराष्ट्र सरकारने सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालयात अत्याधुनिक वाहन तंदुरुस्त चाचणी केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला असून, याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. पुढील वर्षापर्यंत हे केंद्र कार्यान्वित होणार असून, वाहनधारकांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे.

हे केंद्र नाशिक आणि संभाजीनगरनंतर महाराष्ट्रातील तिसरे अद्ययावत केंद्र ठरणार आहे. या केंद्रात रिक्षा, टॅक्सी, खासगी वाहने, बसेस, ट्रक आदी सर्वच प्रकारच्या वाहनांची संगणकीकृत चाचणी होणार आहे. यामुळे चाचणी प्रक्रियेतील पारदर्शकता आणि अचूकता वाढणार आहे.

एक्स-रे सारखी चाचणी प्रक्रिया – १५ ते २० मिनिटांत रिपोर्ट हाती.

या चाचणी केंद्रात खालील प्रमुख तपासण्या केल्या जाणार आहेत:

*ब्रेक कार्यक्षमता चाचणी

*चाकांची स्थिती व घर्षण तपासणी

*एक्झॉस्ट एमिशन (धुराचे प्रमाण)

*रिक्षा-टॅक्सी मीटर चाचणी

*ड्रायव्हिंग डिटेक्शन सेन्सर्स

ही सर्व यंत्रणा पूर्णतः संगणकावर आधारित असणार असून, निकाल थेट वाहनधारकाला मिळणार आहे. चाचणीसाठी सरासरी १५ ते २० मिनिटे लागतील.

सदर केंद्रात प्रशिक्षित चालक व तांत्रिक कर्मचारी असणार असून, वाहनधारकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे.

सातारा जिल्ह्यातील वाढत्या वाहन संख्येला उत्तर,साताऱ्यात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर फलटण आणि कराड येथे स्वतंत्र परिवहन कार्यालयांची उभारणी करण्यात आली. आता त्याच जोडीने आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असे तंदुरुस्त चाचणी केंद्र सुरू केल्याने जिल्ह्यातील वाहनधारकांना पुणे किंवा इतर जिल्ह्यांत जावे लागणार नाही.

यापूर्वी, वाहनांची चाचणी ही फक्त काही मीटर गाडी चालवून, कागदपत्र तपासून केली जात होती. मात्र, या नव्या प्रणालीमुळे तांत्रिक आणि वस्तुनिष्ठ मूल्यांकन शक्य होणार आहे.

साताऱ्यातील विकासात नवा टप्पा,या चाचणी केंद्राच्या उभारणीमुळे साताऱ्याच्या प्रादेशिक विकासात एक महत्त्वाचा टप्पा गाठला जात आहे.

वाहनधारकांनी वेळेवर व पारदर्शक चाचणीद्वारे आपल्या वाहनाची काळजी घ्यावी, असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे. स्थान: सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालय,कार्यान्वयन: पुढील वर्षभरात अपेक्षित,प्रकार: सर्व वाहनांकरिता संगणकीकृत तंदुरुस्त चाचणी,कालावधी: १५ – २० मिनिटे,तपासण्या: ब्रेक, चाकं, प्रदूषण, मीटर इत्यादी