single-post

श्रीचक्रधरांचे स्त्रीवादी तत्त्वज्ञान

श्रीचक्रधरांचे तत्त्वज्ञान: आठशे वर्षांपूर्वी स्त्री स्वातंत्र्याचा दिला होता नारा

25 August, 2025

-डॉ.श्रीमंत कोकाटे 

श्री चक्रधर हे तेराव्या शतकातील दार्शनिक होते. राजपरिवाराचा त्याग करून, ते रामदर्शनाच्या ओढीने महाराष्ट्रात आले. गोविंदप्रभू यांचे निरूपण त्यांना रिद्धपूर या ठिकाणी मिळाले. त्यांनी मानवी कल्याणासाठी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, आताचा तेलंगण या प्रदेशात परिभ्रमण केले, किंबहुना संपूर्ण आयुष्य लोककल्याणासाठी समर्पित केले. ते अत्यंत सुंदर, महाबुद्धिमान आणि लोकप्रिय होते. ऐश्वर्यसंपन्न जीवनाचा त्याग करून त्यांनी लोकप्रबोधन केले. त्यांनी विषमतेला विरोध करून समतेचे महत्त्व सांगितले. मुंगीचीदेखील हत्या करू नये, असा अहिंसावाद त्यांनी मांडला. मध्ययुगीन काळ सरंजामी होता. विषमता, स्त्री दास्प आणि अंधश्रद्धेने समाज विकलांग झाला होता. अशा काळात त्यांनी भारतीय समाजाला गतिक विचार सांगून, त्यांच्यात नवचैतन्य निर्माण केले.

मध्ययुगीन काळात स्त्रियांना लिहिण्याचे, बोलण्याचे, निरूपण करण्याचे, धार्मिक विचार मांडण्याचे; किंबहुना व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य नव्हते. 'चूल आणि मूल' यातच स्त्रियांचे जीवन बंदिस्त होते. विधवा स्त्रियांचे जीवन तर खूपच असह्य होते. त्यांचे संपूर्ण जीवन परावलंबी होते आणि मासोपासातच ते व्यतीत करावे लागत असे. अशा कठीण काळात श्रीचक्रधरांनी स्त्रियांना स्वातंत्र्य दिले. त्यांचा आदर आणि सन्मान केला. त्यांना प्रश्न विचारण्याचे, प्रश्नाचे उत्तर देण्याचे, धर्माचरण करण्याचे अधिकार दिले. श्रीचक्रधरांच्या चरित्राची 'लीळाचरित्राची सुरुवातच महदंबा उर्फ महदाईसा यांनी श्रीचक्रधरांना विचारलेल्या प्रश्नाने होते. महदंबेला ज्ञानाच्या क्षेत्रात श्रीचक्रधरांमुळे संधी मिळाली, ती विद्वान होती. तिच्या विद्वत्तेचे वर्णन करताना श्रीचक्रधर म्हणतात,

मध्ययुगात भारतीय समाजाला प्रागतिक विचार सांगणारे, समाजात नवचैतन्य निर्माण करणारे थोर दार्शनिक श्रीचक्रधर यांची आज (२५ ऑगस्ट) जयंती. स्त्रियांचे शोषण करणाऱ्या, त्यांचा अवमान करणाऱ्या अनिष्ट प्रथा त्यांनी नाकारल्या होत्या. त्यांच्या स्त्रीवादी तत्त्वज्ञानाविषयी...

'महदाआईसा जिज्ञासु, चर्चक आहे. ती सतत काही पुसतच (विचारत) असते. महदाईसा ही श्रीचक्रधरांशी विविध विषयांवर चर्चा करीत असे. तीच पुढे मराठीतील आद्य कवयित्री झाली. श्रीचक्रधरांच्या स्त्रीवादी कार्यामुळे तिला हा मान मिळाला. स्त्रीदेखील हिंमतवान, कर्तृत्ववान आणि बुद्धिमान असते, असे त्यांचे मत होते. त्यामुळेस आऊसा या चक्रधर शिष्येचा उल्लेख नायका म्हणूनही केला जातो. ती स्त्री-पुरुष असा भेद विसरून काम करीत असे. श्रीचक्रधरांनी स्वतः स्त्री-पुरुष भेदभाव केला नाही. एकदा श्रीचक्रधर स्वामी स्त्रियांसाठी निरूपण करीत होते, तेव्हा सारंग पंडितांनी याबाबत नापसंती व्यक्त केली. श्रीचक्रधर

त्यांना म्हणाले, 'तुमचा जीव आहे, मग यांच्या काही जीऊलिया आहेत का?' (पुरुषालाच जीव आहे, स्त्रियांना नाही काय?) याद्वारे श्रीचक्रधर स्त्रियांना ज्ञानार्जनाचा अधिकार आहे, हे अधोरेखीत करतात. त्यांनी स्त्रियांचा कैवार घेतला. हा कालखंड सुमारे आठशे वर्षांपूर्वीचा आहे. स्त्रीवाद ही संकल्पना आधुनिक आहे. ती मध्ययुगीन काळात नव्हती, तरीदेखील त्यांच्या तत्त्वज्ञानात स्त्रीवाद प्रकर्षाने जाणवतो. स्त्रियांच्या हक्क, अधिकारांचे त्यांनी समर्थन केले.

मध्ययुगीन काळात विधवांना अशुभ समजले जात असे. अशाच एका गृहस्थाला पाच मुली होत्या. त्या पाचही बालविधवा झाल्या, तेव्हा त्याची

अवहेलना होऊ लागली. तो श्रीचक्रधरांना भेटला, तेव्हा त्यांनी विचारले, 'कशा आहेत पंचगंगा?' मुलींचा असा आदरार्थी उल्लेख करताच त्या गृहस्थाला खूप आनंद झाला. त्या काळात पादत्राणे घातलेल्या महिलांनी ज्येष्ठ पुरुषांचा सन्मान करण्यासाठी ती काढावीत, अशी प्रथा होती. त्यानुसार श्रीचक्रधरांना समोरून येताना पाहताच साधाईसाने पादत्राणे काढून हातात घेतली. तेव्हा चक्रधर तिला म्हणाले, 'साधाईसा वाहाणा का काढल्या? त्या पायात घाला. श्रीचक्रधरांनी स्त्रियांचा अवमान करणाऱ्या अनेक प्रथा नाकारल्या, त्या काळात स्त्रिया महिनोन्महिने उपवास करीत असत. त्यामुळे त्या कुश होत, आजारी पडत. श्रीचक्रधर म्हणाले, 'अशक्तांनी विधी पाळण्याची गरज नाही. श्रीचक्रधरांनी कर्मठपणा नाकारला. त्यांचे तत्त्वज्ञान मानवी मूल्ये जोपासणारे आहे. तपस्याने स्वतःची कामे स्वतः करावीत, स्त्रियांना त्रास देऊ नये, असे ते सांगत. कितीही संकटे आली, तरी त्यांना घाबरू नका. आत्महत्या करणे पाप आहे, असे श्रीचक्रधर आऊसाला म्हणाले होते. मासिक पाळी आली म्हणून दूर बसलेल्या उमाईसाला ते म्हणाले, 'नाकाला येणारा शेंबूड, डोळ्यातील चिपडे, कानातून येणारा मळ, तोडातून येणारी धुंकी आणि मासिक पाळी या नैसर्गिक क्रिया आहेत."

श्रीचक्रधरांचे विचार बुद्धिप्रामाण्यवादी आहेत. मासिक पाळी अपवित्र, अशुद्ध किवा अनैसर्गिक नाही; त्यामुळे तिचा विटाळ पाळायची गरज नाही, असे ते आठशे वर्षांपूर्वी सांगत होते.

श्रीचक्रधरांनी प्रत्येक व्यक्तीच्या अभिव्यक्तीचे, अर्थात स्वातंत्र्याचे समर्थन केले. कोणालाही दास किंवा गुलाम समजू नका. कोणावरही निर्बंध लादू नका किंवा कोणाच्याही बंधनात राहू नका, असे त्यांचे सांगणे होते. ते राणाईसाला म्हणतात, 'स्वातंत्र्य हे मोक्षासमान आहे. पारतंत्र्य हे बंधन आहे. याद्वारे त्यांनी स्त्री स्वातंत्र्याचे अर्थात व्यक्तिस्वातंत्र्याचे महत्त्व सांगितले. त्यांनी आबाईसाला चित्र रेखाटण्यासाठी प्रेरणा दिली. एकाईसाला गायनासाठी प्रोत्साहन दिले. धानाईसाला काऊचिऊची गोष्ट सांगितली. देमतीला काव्यरचनेसाठी प्रेरित केले. नागुबाईसांना मत मांडण्याचे स्वातंत्र्य दिले. पती, मुलगा मृत्यू पावला म्हणून सतत दुःख करीत बसणाऱ्या माईबाईसांना (शांताबाईसा) श्रीचक्रधर महणाले, 'दुःख केल्याने पाप लागते.'

श्रीचक्रधरांनी मध्ययुगीन काळात स्त्रियांना ज्ञानार्जनाचे, मत व्यक्त करण्याचे, सर्वांगिण विकास करण्याचे स्वातंत्र्य दिले. स्त्री-पुरुष भेदभाव करणे हा अधर्म आहे, असे त्यांचे तत्त्वज्ञान आहे. स्त्रियांचे शोषण करणाऱ्या, त्यांचा अवमान करणाऱ्या अनिष्ट प्रथा त्यांनी निर्धारपूर्वक नाकारल्या. आज श्रीचक्रधर यांची जयंती आहे. त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!

(लेखक इतिहास व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आहेत.)