टिळक पूल वाहतुकीसाठी बंद ; शनिवार वाड्यापर्यंत पाणी येण्याची शक्यता
मुठा नदीला पूरस्थिती; धोक्याचा इशारा : शनिवार वाड्यापर्यंत पाणी येऊ शकते!
20 August, 2025
पुणे दि.२० (जरंडेश्वर समाचार): गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे मुठा नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी टिळक पूलावर पाण्याचा जोर वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने हा पूल तत्काळ वाहतुकीसाठी बंद केला आहे.
नदीपात्रातील पाणी वेगाने वाढत असून शनिवार वाड्यापर्यंत पाणी पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पुणे महानगरपालिकेने नागरिकांना नदीकाठच्या भागात अनावश्यक वावर टाळण्याचे आवाहन केले आहे. पोलिस आणि आपत्कालीन पथके सतर्क असून, आवश्यक असल्यास नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची तयारी ठेवण्यात आली आहे.
टिळक पूल हा शहरातील महत्वाचा दळणवळण दुवा असल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे. पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले असून, शनिवारी पेठ परिसरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येत आहे.
दरम्यान, खडकवासला धरणातून वाढीव विसर्ग सुरू असून, पुढील काही तासांत पाणीपातळीत आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी दक्ष राहावे, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.