single-post

साताऱ्यात एनडीआरएफचा पराक्रम : पुरातून ११ माकडांची सुटका

मानवतेसोबत प्राणीमात्रांचीही काळजी – एनडीआरएफचा साताऱ्यातील शौर्यकृत्य; पाण्याच्या वेगात अडकलेल्या माकडांना एनडीआरएफचे जीवावर उदार होऊन रेस्क्यू

20 August, 2025

सातारा दि.(जरंडेश्वर समाचार) गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी नद्या-ओढे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. काही ठिकाणी गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा संकटाच्या काळात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाने (एनडीआरएफ) साताऱ्यात दाखवलेला पराक्रम उल्लेखनीय ठरला आहे.

तालुक्यातील पुरग्रस्त भागात झाडावर अडकलेल्या ११ माकडांना एनडीआरएफच्या जवानांनी धाडस करून वाचवले. पाण्याचा वेग प्रचंड असल्याने माकडं सुरक्षितपणे खाली उतरू शकत नव्हती. स्थानिक नागरिकांनी ही बाब लक्षात येताच प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर तात्काळ एनडीआरएफ पथक घटनास्थळी दाखल झाले.

जवानांनी दोरी व बोटींच्या साहाय्याने सुमारे तासभर चाललेल्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर सर्व ११ माकडांची सुटका केली. त्यानंतर गावकऱ्यांनी एनडीआरएफचे आभार मानले. या घटनेमुळे केवळ माणसांच्याच नव्हे तर प्राण्यांच्याही सुरक्षेसाठी एनडीआरएफ किती सतर्क आणि समर्पित आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

दरम्यान, साताऱ्यातील विविध ठिकाणी अद्यापही बचावकार्य सुरू असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.