सदस्यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप; चौकशीची मागणी तीव्र
कास वनसमित्यांमध्ये गैरव्यवहाराचा बोभाटा
22 August, 2025
बामणोली/कास, दि. (जरंडेश्वर समाचार) जागतिक वारसा स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले कास पुष्प पठार सध्या व्यवस्थापनातील गोंधळामुळे चर्चेत आले आहे. पर्यटकांच्या हंगामाच्या नियोजनासाठी नुकत्याच घेतलेल्या बैठकीत नियोजनाऐवजी आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप पुढे आल्याने वातावरण तापले. या प्रकरणात सर्व पदाधिकाऱ्यांच्या बँक खात्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी सदस्य आणि ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.
नियोजनाऐवजी आरोपांचा वर्षाव,वनभवनात झालेल्या बैठकीस कास पठार परिसरातील सहा गावांतील समित्यांचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि माजी सदस्य उपस्थित होते. अपेक्षेप्रमाणे नियोजनावर चर्चा न होता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली. भ्रष्टाचार व आर्थिक गैरव्यवहाराचे मुद्दे समोर येताच संपूर्ण वातावरण ढवळून निघाले.
‘सोन्याची अंडी देणारी कोंबडी’ की भ्रष्टाचाराचे अड्डे?कास पठार हे पर्यटनामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा फायदा करून देत असले, तरी या उत्पन्नात पारदर्शकता नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. समितीचे अध्यक्ष प्रदीप कदम यांनी ठाम भूमिका घेत, “पठार सुरू झाल्यापासून आजवर कार्यकारी राहिलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या बँक खात्यांची सखोल चौकशी झालीच पाहिजे,” अशी मागणी केली.
या मागणीला कार्यकारी समितीचे माजी अध्यक्ष सोमनाथ जाधव यांनी देखील पाठिंबा दिला. “गैरव्यवहार झाला असल्यास तो उघडकीस यायलाच हवा. पारदर्शक तपासणी ही अपरिहार्य आहे,” असे ते म्हणाले. कास गावचे संपत गोरे यांच्यासह काही ग्रामस्थांनीही चौकशीची गरज अधोरेखित केली.
ग्रामस्थांचा संताप,बैठकीदरम्यान काही ग्रामस्थांनी भ्रष्टाचार करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करून त्यांना तुरुंगात डांबावे, अशी संतप्त मागणी केली. परिणामी, बैठकीचे स्वरूप नियोजनाऐवजी वादग्रस्त ठरले.
वनविभागाच्या ताब्यात कारभार?गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे अनेक ग्रामस्थांनी पुढील वर्षापासून सर्व समित्या बरखास्त करून पठाराचा संपूर्ण कारभार वनविभागाने स्वतःकडे घ्यावा, अशी मागणी केली आहे. “समित्यांच्या माध्यमातून होणारा कारभार हा भ्रष्टाचारालाच खतपाणी घालणारा ठरतो आहे. त्यामुळे पारदर्शक व्यवस्थापनासाठी वनविभागाने पुढाकार घ्यावा,” अशी ग्रामस्थांची ठाम भूमिका आहे.
दरवर्षी हजारो पर्यटकांना आकर्षित करणारे कास पुष्प पठार हे नैसर्गिक वारसा स्थळ आहे. अशा ठिकाणीच गैरव्यवहाराचे आरोप होत असल्याने या ठिकाणच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुढील काळात चौकशी खरंच निःपक्षपातीपणे होणार का, दोषींवर कारवाई होणार का आणि व्यवस्थापनाची सूत्रे कोणाच्या हाती राहणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.