भिलारमध्ये मुसळधार पावसाने शाळेचा भाग कोसळला
पुस्तकांच्या गावात’ पावसाचा कहर; शाळेच्या इमारतीला तडा
21 August, 2025
भिलारमध्ये मुसळधार पावसाने शाळेचा भाग कोसळला
भिलार दि.२१ (जरंडेश्वर समाचार)– सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिलार परिसरात मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचा काही भाग कोसळला असून केंद्रप्रमुख कार्यालयाचे नुकसान झाल्याचे प्राथमिक निष्कर्ष महसूल विभागाच्या पंचनाम्यातून समोर आले आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून भिलार व परिसरात संततधार पाऊस सुरु आहे. यामुळे भिलार केंद्र शाळेच्या इमारतीतील केंद्रप्रमुख कार्यालयाचा स्लॅब व भिंत कोसळली. आज सकाळी महसूल विभागाने तातडीने पंचनामा करून नुकसानीचा अहवाल तयार केला.
या घटनेमुळे शाळेच्या कामकाजात अडथळा निर्माण झाला असून, स्थानिक प्रशासन व ग्रामपंचायत स्तरावर तातडीची उपाययोजना सुरू करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रवीण भिलारे, नायब तहसीलदार दीपक सोनवणे, सरपंच शिवाजीराव भिलारे, केंद्रप्रमुख सुरेंद्र भिलारे, ग्रामसेवक राजेंद्र चव्हाण, कृषी सहाय्यक श्री. जगताप, संतोष धनावडे, पोलिस पाटील रूपाली कांबळे आदी पदाधिकारी व अधिकारी यांनी आज घटनास्थळी जाऊन नुकसानीची पाहणी केली.
पावसामुळे शाळेबरोबरच रस्त्यांचे व शेतमालाचेही मोठे नुकसान झाल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले. विशेषतः स्ट्रॉबेरी पिकाला मोठा फटका बसला असून याचा आर्थिक परिणाम पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने शाळा दुरुस्ती व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.