single-post

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, वाहनधारकांना मोठा दिलासा

खड्डेमय महामार्गांवर टोल नाही!

21 August, 2025

खड्डेमय महामार्गांवर टोल नाही!;सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, वाहनधारकांना मोठा दिलासा

नवी दिल्ली :(जरंडेश्वर समाचार)देशभरातील वाहनचालकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. रस्ते खड्डेमय असतील किंवा वाहतूक कोंडीमुळे प्रवास करणे अशक्य होत असेल, तर अशा महामार्गांवर टोल आकारला जाऊ शकत नाही, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

हा निकाल दिल्यामुळे, "खराब रस्ते आणि तरीही टोल" हा वाहनधारकांचा कायमचा त्रास आता संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील पलियाक्कारा टोल नाक्यावर वसुलीला स्थानिक उच्च न्यायालयाने आधीच बंदी घातली होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व कंत्राटदार कंपनीने तो आदेश रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावत उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला.

"नागरिकांचे कल्याण अधिक महत्त्वाचे",खंडपीठाने स्पष्ट केले की, रस्त्यांसाठी नागरिक आधीच कर भरतात. त्यामुळे त्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रवास करता यायला हवा. रस्ते खड्डेमय असल्यास किंवा तासन्तास वाहतूक कोंडीत उभे राहावे लागत असल्यास, टोल वसुली योग्य नाही.

"१२ तासांचा प्रवास, मग टोल कशासाठी?"न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा युक्तिवाद फेटाळून लावत उपरोधिक प्रश्न केला – “६५ कि.मी.च्या मार्गावर ५ कि.मी. रस्ता खराब असल्याने संपूर्ण मार्ग ठप्प होतो. केरळमध्ये एका विभागात वाहनांना १२ तास उभे रहावे लागले. मग अशा परिस्थितीत १५० रुपये टोल कोणी द्यावा?”

वाहनधारकांकडून स्वागत,या निकालामुळे देशभरातील वाहनधारकांतून आनंद व्यक्त केला जात असून, सोशल मीडियावरही या निर्णयाचे जोरदार स्वागत होत आहे. खड्डेमय महामार्ग आणि टोल वसुली याविरोधात सुरू असलेल्या जनआक्रोशाला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने योग्य दिशा मिळाली आहे.