मानव-बिबटया संघर्ष टाळण्यासाठी सातारा वनविभागाची जनजागृती मोहीम
पालकमंत्री शंभूराज देसाई : वनविभागाचे उपक्रम कौतुकास्पद
21 August, 2025
पाटण दि. : जिल्ह्यात वाढत्या मानव–बिबटया संघर्षाच्या घटनांना आळा घालण्यासाठी सातारा वनविभागाने विशेष चित्रफितींची निर्मिती केली असून त्याचा मोठा लाभ सर्वसामान्यांना होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केले.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने या चित्रफितींचे अनावरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक तुषार दोशी, उपवनसंरक्षक अमोल सातपुते व इतर अधिकारी उपस्थित होते.
बिबट्यांच्या हालचालींनी नागरिकांमध्ये भीती,गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील डोंगरपट्टी व ग्रामीण भागात बिबट्यांच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भर श्रावणात लागलेल्या वणव्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली होती. अशा पार्श्वभूमीवर वनविभागाने डिजिटल माध्यमातून जनजागृती करण्याचा निर्णय घेतला.
सहजीवनाचा संदेश,उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राबविलेल्या या पहिल्या उपक्रमास मोठी उत्सुकता लाभली. "बिबट्याचा जीव वाचवून माणसाचे प्राण सुरक्षित ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. अफवा पसरवू नयेत, शेतात किंवा वाड्यात एकटे फिरू नये, लहान मुलांना एकटे सोडू नये, उघड्यावर झोपणे व शौचास जाणे टाळावे, तसेच वणवे रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न व्हावेत," अशा सूचना या चित्रफितीतून देण्यात आल्या आहेत.
चित्रफितींची खासियत,अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिच्या अभिनयातून तयार झालेल्या सहा लघु-जिंगल्सद्वारे हा संदेश प्रभावी पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचविण्यात आला आहे. या व्हिडीओंना सातारा वनविभागाच्या यूट्यूब व इंस्टाग्रामवर स्वातंत्र्यदिनी प्रसारित करण्यात आले.
प्रशासनाचा विश्वास,"या डिजिटल मोहिमेमुळे बिबट्यांविषयीचे गैरसमज दूर होतील व आवश्यक ती काळजी घेण्याबाबत गावोगावी जनजागृती होईल," असा विश्वास जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी व्यक्त केला. तर पालकमंत्री देसाई यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, "वनविभागाने हाती घेतलेली ही जनजागृती मोहीम खर्या अर्थाने जीवन वाचविणारी ठरेल," असेही स्पष्ट केले.