गणेशोत्सवाला ‘राज्यमहोत्सव’ दर्जा; बोधचिन्हाचे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते अनावरण
अकरा कोटींच्या निधीतून गणेशोत्सवाचा राज्यमहोत्सव साजरा
19 August, 2025
मुंबई दि.१९(जरंडेश्वर समाचार): यंदाच्या वर्षापासून महाराष्ट्रातला गणेशोत्सव हा थेट राज्यमहोत्सव म्हणून साजरा होणार असून, त्याच्या बोधचिन्हाचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रिमंडळ बैठकीनंतर करण्यात आलं. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तसेच राज्याचे अनेक मंत्री उपस्थित होते.
गणेशोत्सवाचं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचं महत्त्व अधोरेखित व्हावं यासाठी राज्य शासनाने विशेष पुढाकार घेतला असून, विविध सांस्कृतिक उपक्रम, व्याख्याने, लोककला, रोषणाई, स्पर्धा यासाठी जवळपास अकरा कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय.
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले की, “गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक एकतेचा मानबिंदू आहे. आपल्या परंपरेला आधुनिकतेशी सांगड घालून जगभर गणेशोत्सव पोचवायचा आहे. पर्यटन वाढवायचं, संस्कृती-जडणघडणीचं जतन-संवर्धन करायचं, यासाठी सरकारनं राज्यमहोत्सवाचा दर्जा दिलाय.”
गणेशोत्सव हा फक्त धार्मिक न राहता सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक व्यासपीठ म्हणून पुढं आलाय. म्हणूनच त्याची राज्यमहोत्सव म्हणून ओळख निर्माण करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
याशिवाय या महोत्सवाशी दोन विषय जोडले गेले आहेत –
1. भारतीय सैन्यानं गाजवलेलं ‘ऑपरेशन सिंदूर’
2. आत्मनिर्भर भारतासाठीचा ‘स्वदेशीचा जागर
यामुळे गणेशोत्सवाला नवा सांस्कृतिक उन्मेश मिळणार असून राज्याचा गौरव जगभरात पोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.