single-post

राज्य सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलवावे -आमदार शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

राज्य शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा

19 August, 2025

मुंबई | दि.१९(जरंडेश्वर समाचार):-राज्यात यंदा पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरी, सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. खरीप हंगामात पिके उगवण्याआधीच नष्ट झाली, तर अनेक ठिकाणी उभ्या पिकांवर पावसाचे पाणी साचून  पिके कुजली आहेत. परिणामी अनेक जिल्ह्यांत “ओल्या दुष्काळासारखी” परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी  राज्य सरकारने “तात्काळ अधिवेशन बोलावावे आणि ओला दुष्काळ जाहीर करावा,” अशी मागणी केली आहे.

सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे, सोलापूर, नाशिक, उस्मानाबाद, लातूर अशा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे सोयाबीन, मका, भात, भाजीपाला, ऊस, डाळी अशी पिके पूर्णपणे उध्वस्त झाली आहेत. शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले असून, पीकविमा कंपन्यांकडूनही तातडीने मदत मिळालेली नाही. शेतीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावे अशी मागणी आमदार शशिकांतजी शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

 “राज्य सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलवावे. शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान तातडीने मोजणी करून ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा. शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत द्यावी. पीकविमा कंपन्यांना जबाबदार धरून त्वरित नुकसानभरपाई दिली पाहिजे. अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल. असा इशारा शिंदे यांनी राज्य सरकारला दिला आहे.”

आधीच पावसामुळे “पिक वाचवायचे की कुटुंब चालवायचे” या दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. आज.शशिकांत शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी ओला दुष्काळ जाहीर करणे,तत्काळ आर्थिक मदत विनाविलंब नुकसानभरपाई,बँक कर्जमाफी व व्याजमाफी,पीकविमा कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.