उरमोडी प्रकल्पासाठी 3,042.67 कोटींची मंजुरी; साताऱ्यात आनंदाचे वातावरण
खासदार छत्रपती उदयनराजेंच्या पाठपुराव्याला यश — पावसाळा संपताच कामांना गती
20 August, 2025
सातारा, दि. 20 (जरंडेश्वर समाचार) : साताऱ्याचा महत्त्वाकांक्षी उरमोडी धरण प्रकल्प अखेर गतीमान होणार आहे. केंद्र सरकारच्या जल आयोगाच्या प्रकल्प मूल्यांकन समितीने या धरणाच्या उर्वरित कामांसाठी तब्बल ₹3,042.67 कोटींची सुधारित मंजुरीचे पत्र खासदार उदयनराजे भोसले यांना देण्यात आले. यावेळी अमर काशीद कार्यकारी अभियंता उरमोडी विभाग सातारा, काका धुमाळ, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या निधीच्या मंजुरीनंतर प्रकल्पाला नवे बळ मिळाले असून पावसाळा संपताच कामांना वेग येणार आहे. या निर्णयामुळे संपूर्ण जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सिंचनाखाली 27,750 हेक्टर क्षेत्र््उरमोडी धरणामुळे माण, खटाव आणि सातारा तालुक्यांतील तब्बल 27,750 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यामुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शेती उत्पादनात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे.
पूर्वीची मर्यादित मंजुरी अपुरी,,या प्रकल्पासाठी यापूर्वी ₹1,417.19 कोटींची प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. मात्र त्या निधीमुळे उर्वरित कामांना पुरेशी गती मिळाली नव्हती. 2018 मध्ये हा प्रकल्प केंद्र सरकारच्या ‘बीजेएसवाय’ योजनेत समाविष्ट करण्यात आला. पण गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या नजरा निधी व कामांच्या प्रतीक्षेत होत्या.
उदयनराजेंचा पाठपुरावा,या निधीमागे सातत्याने पाठपुरावा करणारे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे सांगितले. “उरमोडी प्रकल्प पूर्णत्वाला जाऊन साताऱ्याच्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा, हेच माझे ध्येय होते. आता हा ऐतिहासिक दिवस गाठला आहे,” असे उदयनराजेंनी स्पष्ट केले.
डिसेंबर 2027 पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य,निधी मंजुरीनंतर प्रकल्पाची कामे काटेकोर नियोजनासह हाती घेतली जाणार आहेत. डिसेंबर 2027 पर्यंत उरमोडी प्रकल्प पूर्ण होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
साताऱ्यासाठी जीवनरेषा,सिंचनाची सोय, पाणीपुरवठा व शेती उत्पादनात होणारी वाढ लक्षात घेता हा प्रकल्प साताऱ्याच्या दुष्काळग्रस्त भागासाठी जीवनरेषा ठरणार आहे. शेतकऱ्यांमध्ये समाधानाची आणि उत्साहाची लाट आहे.