single-post

महिलेला जटामुक्त करून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना कृतिशील अभिवादन

कोरेगावात महिलेला जटामुक्त करून अंधश्रद्धेविरोधी लढ्याला बळ

20 August, 2025

कोरेगाव, दि. 20(जरंडेश्वर समाचार)ऑगस्ट 2025 – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (म.अंनिस) कोरेगाव शाखेतर्फे हुतात्मा स्मारक येथे आयोजित केलेल्या विशेष उपक्रमात भाकरवाडी (ता. कोरेगाव) येथील संगीता चव्हाण या महिलेला जटामुक्त करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून शहिद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या 12 व्या स्मृतीदिनी त्यांना कृतिशील अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी म.अंनिसचे सातारा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बर्गे यांनी जटामुक्तीनंतर बोलताना सांगितले की, “अंधश्रद्धाविरोधी लढ्यात कोरेगाव शाखा नेहमीच अग्रेसर राहिली आहे. भविष्यातही अशा कृतिशील उपक्रमांचे सातत्य राखले जाईल.”

जटामुक्तीची प्रक्रिया राज्य कार्यकारिणी सदस्य प्रशांत पोतदार व राज्य कायदा विभाग सदस्य ॲड. हौसेराव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा येथील लाजली ब्युटी पार्लरच्या संचालिका सौ. हर्षाली पोतदार यांनी पार पाडली. या वेळी जिल्हा प्रसारमाध्यम सचिव दशरथ रणदिवे, सातारा शहर प्रसारमाध्यम सचिव व युवा कार्यकर्ते राजेश पुराणिक, हेमंत जाधव, दिलीप वेलिया, सुधाकर बर्गे, जगुबाई फरांदे, मानस पोतदार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रशांत पोतदार यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, “आजची जटामुक्ती ही डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना दिलेली अनोखी श्रद्धांजली आहे. त्यांच्या विचारांना कृतिशीलपणे पुढे नेण्याचा आमचा निर्धार आहे.” तर ॲड. हौसेराव धुमाळ यांनीही दाभोलकरांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवण्याचे आवाहन केले.

संगीता चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “गेल्या 10 वर्षांपासून जटेमुळे मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत होता. काही लोकांनी विधीवत पूजा न केल्यास धोका निर्माण होईल, असे भीतीदायक सल्ले दिले. मात्र अंनिस कार्यकर्त्यांच्या समुपदेशनामुळे मी धैर्याने पुढाकार घेतला आणि आज हलकं वाटत आहे.”

शेवटी प्रशांत पोतदार यांनी असे जटामुक्तीचे कार्य म.अंनिसचे कार्यकर्ते पूर्णपणे मोफत करतात, असे सांगत त्रस्त महिलांनी निर्भयपणे संपर्क साधावा, असे आवाहन केले. “विवेकाचा आवाज बुलंद करूया” या घोषणेने हा उपक्रम संपन्न झाला.