बोर्ड परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांची नोंदणी ३१ ऑगस्टपर्यंत
प्रत्येक शाळेला ५० विद्यार्थ्यांची मर्यादा – विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर
20 August, 2025
कोल्हापूर दि.२०(जरंडेश्वर समाचार): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या दहावी (SSC) व बारावी (HSC) बोर्ड परीक्षांसाठी खाजगी विद्यार्थी (फॉर्म क्र.१७) नोंदणीची प्रक्रिया १ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. ही नोंदणी ३१ ऑगस्ट २०२५ अखेरपर्यंत करता येणार असून, प्रत्येक शाळेत जास्तीत जास्त ५० विद्यार्थ्यांचीच नोंदणी करता येईल, अशी माहिती कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.
क्षीरसागर यांनी सांगितले की, ही योजना नियमित शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा शिक्षणाची दारे उघडणारी आहे. आर्थिक अडचणी, कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा इतर कारणांमुळे शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यांना यामुळे मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळेल.
पात्रता निकष दहावी (SSC) : किमान ५वी उत्तीर्ण असणे व ३१ जुलै २०२५ रोजी वय किमान १४ वर्षे असणे आवश्यक. परराज्यातील/परदेशातील विद्यार्थ्यांसाठी दोन वर्षांचे महाराष्ट्रातील रहिवासी प्रमाणपत्र अनिवार्य.बारावी (HSC) : दहावी परीक्षा किमान दोन वर्षांपूर्वी उत्तीर्ण (उदा., जुलै २०२४ पर्यंत). विज्ञान शाखेसाठी दहावीत विज्ञान विषयात ३५% गुण व इंग्रजी अनिवार्य. परराज्यातील विद्यार्थ्यांसाठी योग्यता प्रमाणपत्र आवश्यक. सध्या कोणत्याही शाळा/महाविद्यालयात नियमित विद्यार्थी नसावा.
नोंदणी प्रक्रिया नोंदणीसाठी अर्ज मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर Student Corner → Form No.17 या विभागात उपलब्ध आहे. अर्ज भरून संबंधित शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात कागदपत्रांसह जमा करावा लागेल.
आवश्यक कागदपत्रे –शाळा सोडल्याचा दाखला,आधार कार्ड,(बारावीसाठी) दहावीची गुणपत्रिका,पासपोर्ट फोटो,हमीपत्र (प्रपत्र क्र. १, २, अ, ब),दिव्यांग विद्यार्थ्यांनी वैद्यकीय प्रमाणपत्र/UDID कार्ड सादर करणे आवश्यक,नोंदणी शुल्क ₹१,११० व प्रक्रिया शुल्क ₹१०० निश्चित आहे.
महत्वाच्या सूचना केवळ सामान्य शिक्षण गटातील विषय उपलब्ध, तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रम नाहीत. खाजगी विद्यार्थ्यांना तोंडी, प्रात्यक्षिक व प्रकल्प सादर करावे लागतील.विज्ञान शाखेसाठी प्रयोगशाळा सुविधा असलेले मान्यताप्राप्त महाविद्यालय निवडणे बंधनकारक. अर्ज सादर केल्यानंतर बदल करता येणार नाहीत, त्यामुळे सर्व तपशील नीट तपासावेत.
“विद्यार्थ्यांनी ही संधी साधून ३१ ऑगस्टपूर्वी नोंदणी पूर्ण करावी,” असे आवाहन विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.