single-post

शेतपीक, घरे, व्यावसायिकांचे नुकसान भरपाईसाठी त्वरित पंचनाम्याचे आदेश

शेतपीक, घरे, व्यावसायिकांचे नुकसान भरपाईसाठी त्वरित पंचनाम्याचे आदेश;सातारा जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट; प्रशासन सतर्क राहण्याचे निर्देश

20 August, 2025

सातारा दि.२०(जरंडेश्वर समाचार): राज्यात पावसाचा जोर वाढला असून पुढील काही दिवस तो कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून बाधितांना जलद मदत देण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

भारतीय हवामान विभागाने विदर्भ, मराठवाडा व कोकणासह सातारा जिल्ह्यास ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सतर्क राहून नागरिकांना तातडीची मदत उपलब्ध करून द्यावी, असेही पाटील यांनी सांगितले. शासन नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, शेतपीक, फळबागा, घरांची पडझड, टपऱ्या वा छोटे व्यावसायिक यांचे नुकसान झाल्यास त्यांचे पंचनामे करून त्वरित मदत दिली जावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झाल्यास पीडित कुटुंबीयांना मदत, तसेच जखमींना आर्थिक सहाय्य तत्काळ मिळावे, यासाठी शासनाने उणे प्राधिकृत पत्रावरून निधी उपलब्ध करून देण्यास आधीच परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही वेळ न दवडता बाधितांना दिलासा द्यावा, असे आदेश मंत्री पाटील यांनी दिले आहेत.

 म्हणजेच, अतिवृष्टी-पूरस्थितीत बाधितांना मदतीसाठी प्रशासनाने सज्ज राहून पंचनामे तातडीने करावेत, असा स्पष्ट इशारा मदत व पुनर्वसनमंत्र्यांनी दिला आहे.