single-post

सातारा राजकारणात गोरे-पाटील ठिणगीचा वणवा पेटला..

भाजप देवेंद्र फडणीस गट–राष्ट्रवादी अजित पवार गटात ‘कुस्ती’; गोरे विरुद्ध पाटील थेट आमनेसामने..!

20 August, 2025

सातारा दि.२०(जरंडेश्वर समाचार): जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. राज्य पातळीवर महायुती एकत्र निवडणुका लढेल अशी घोषणा वारंवार होत असली, तरी सातारा जिल्ह्यात मात्र वेगळेच चित्र दिसत आहे. भाजप देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या दोन घटक पक्षांमध्ये मतभेद प्रकर्षाने पुढे येत असून महायुतीतील दोन बलाढ्य नेते परस्परांच्या मतदारसंघात थेट भिडलेले दिसत आहेत. ना.जयकुमार गोरे ,ना.मकरंद पाटील हे मात्र निमित्त असले तरी खरी लढत देवेंद्र फडणीस विरुद्ध अजितदादा पवार अशीच कुस्ती सातारा जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लढली जाणार असल्याची चर्चा सातारा जिल्ह्यामध्ये होताना दिसत आहे.  एकमेकांच्या मतदारसंघात कार्यक्रम आयोजित करीत असल्यामुळे  आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ची रणधुमाळी जोरदार पाहायला मिळेल यात शंका वाटत नाही.

भाजपचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वबळाचा नारा देत वाई-खंडाळा मतदारसंघाला टार्गेट केले आहे. लोणंद, अहिरे, शिरवळ आणि बावधन येथे झालेल्या सभांमधून त्यांनी राष्ट्रवादीचे नेते मकरंद पाटील यांच्यावर नाव न घेता प्रखर टीका केली.“खंडाळ्याच्या काही भागात अजूनही पाणी नाही; या मातीला दुष्काळातून मुक्त करायचे असेल तर कर्तृत्ववान नेतृत्वाची गरज आहे”, अशा शब्दांत त्यांनी थेट शालजोडे लगावले.

बावधन येथील सभेत त्यांनी मकरंद पाटील यांचे विरोधक असलेल्या अरुणादेवी पिसाळ व शशिकांत पिसाळ यांना भाजप प्रवेशाची ऑफर दिली. तसेच “मला कधी नो बॉल टाकायचा, कधी यॉर्कर टाकायचा हे माहिती आहे” या शैलीतून त्यांनी स्थानिक नेत्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला. या सातत्यपूर्ण हल्ल्यांना सुरुवातीला शांततेने उत्तर देणारे मकरंद पाटील आता प्रतिआक्रमणावर उतरले आहेत.

दि.२४ ऑगस्ट रोजी दहिवडी बाजार पटांगणावर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांचा राष्ट्रवादी (अजितदादा गट) प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपस्थित राहणार असून पाटील यांनी या माध्यमातून आपली ताकद दाखवण्याची तयारी केली आहे.

विशेष म्हणजे अनिल देसाई हे जयकुमार गोरे यांचे कट्टर विरोधक मानले जातात. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाने स्थानिक राजकीय समीकरणे ढवळून निघणार, यात शंका नाही.राज्य पातळीवर महायुती एकत्र असल्याचे सांगितले जात असले तरी साताऱ्यात मात्र भाजप आणि राष्ट्रवादी अजित गट एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेले दिसत आहेत.

गोरे यांनी पाटील यांच्या मतदारसंघात भाजपाची पक्षबांधणी सुरू केली आहे. तर पाटील यांनी गोरे यांच्या विरोधकांना आपल्या गोटात आणून महायुतीतील एकतेलाच धक्का दिला आहे. स्थानिक स्तरावर चर्चा रंगली आहे की, जर या निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर झाल्या तर भाजपाला मोठा फटका बसू शकतो. अनेक राजकीय पक्षांनी ईव्हीएमच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून प्रकाश आंबेडकरांनी या संदर्भात सुप्रीम कोर्टाचीही दारं ठोठावली आहेत. त्यामुळे साताऱ्यातील सामान्य जनतेतही “बॅलेट पेपर आल्यास जिल्हा परिषद वर भाजपाचा झेंडा फडकवण्याचे स्वप्न  राहून जाईल” अशी चर्चा जोरात आहे.

जिल्हा परिषदेच्या रणधुमाळीपूर्वी महायुतीतील दोन नेते परस्परांना डिवचत आहेत. भाजप स्वबळावर झेंडा फडकवण्याच्या तयारीत आहे, तर राष्ट्रवादी अजित गट स्थानिक पातळीवर आपला गट मजबूत करण्यात गुंतलेला आहे. महायुतीतील ठिणगी हाच वणवा बनून जिल्ह्यात निवडणुकीपूर्वी राजकीय भूकंप घडवून आणेल का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.आता  खरी कुस्ती भाजप देवेंद्र फडणीस गट–राष्ट्रवादी अजितदादा पवार गटातील ’; गोरे विरुद्ध पाटील यांच्यात थेट आमनेसामने रंगणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी पूर्वी.च दोन नेत्यांच्या टीका टिपणीला सुरुवात झाली आहे , राजकीय वातावरण ढवळून निघेल यात शंका वाटत नाही .हे  दोन नेत्यांच्यामुळे कार्यकर्त्यांच्या नवचैतन्य निर्माण होईल आणि कर्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला लागतील.!