रिक्षाचालकानं महिला पोलिसाला १०० मीटर फरफटत नेलं; साताऱ्यात धक्कादायक प्रकार
बसस्थानकाबाहेर थरार! रिक्षानं पोलिसांना न जुमानता भरधाव पळ काढला
20 August, 2025
सातारा दि.२०(जरंडेश्वर समाचार)सातारा बसस्थानकाबाहेर सायंकाळी घडलेल्या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे. अपघात करून पळ काढणाऱ्या एका रिक्षाचालकानं महिला पोलिसाला तब्बल १०० मीटर फरफटत नेलं. यात हवालदार भाग्यश्री जाधव या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोळाचा ओढा परिसरात एका रिक्षाचालकानं (क्र. MH 02 S 7208) अनेक दुचाकींना धडक दिल्याची खबर पोलिस कंट्रोल रूमला मिळाली होती. हीच माहिती डायल-112 वरून बसस्थानक परिसरात ड्युटीवर असलेल्या पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर काही वेळातच तोच रिक्षाचालक भरधाव वेगानं बसस्थानकाकडे धावताना दिसला.
यावेळी महिला पोलिस कर्मचारी भाग्यश्री जाधव यांनी त्याला थांबवण्याचा इशारा केला. पण रिक्षाचालकानं पोलिसांचा इशारा धाब्यावर बसवत रिक्षा अजून भरधाव नेली. त्यानंतर जाधव यांनी एका दुचाकीवर मागे बसून त्याचा पाठलाग सुरू केला. जवळपास एक किलोमीटरपर्यंत हा थरार सुरू राहिला.
दरम्यान झटापटीत हवालदार जाधव यांच्या गणवेशातील टोपी रिक्षेत अडकली. त्यामुळे त्या रिक्षेसोबत ओढल्या गेल्या व खाली पडल्या. तरीसुद्धा चालकानं रिक्षा थांबवली नाही. परिणामी भाग्यश्री या जवळपास १०० मीटर फरफटत गेल्या.
शेवटी पोलिसांनी पाठलाग करत रिक्षा अडवली आणि चालकाला ताब्यात घेतलं. तो दारूच्या नशेत असल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. जखमी महिला पोलिसांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापती झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकारामुळे साताऱ्यात संताप व्यक्त होत असून, भरधाव वेगात व बेजबाबदार पद्धतीनं वाहन चालवणाऱ्या चालकांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.