सातारा जिल्हा माहिती कार्यालयाचा राज्यस्तरीय सन्मान
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान
18 August, 2025
सातारा दि.१८(जरंडेश्वर समाचार): राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सातारा जिल्हा माहिती कार्यालयाला राज्यस्तरीय सन्मान मिळाला आहे. जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांना राज्याचे पर्यटन व खनिकर्म मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, तसेच जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी राहूल पवार, वैभव जाधव, रुपाली तारळकर, अनिल नलवडे, सचिन राऊत, अनिता काशिद आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर राबविण्यात आलेल्या या मोहिमेत १२,५०० शासकीय कार्यालयांचा सहभाग होता. त्यात जिल्हा माहिती कार्यालय सातारा राज्यस्तरावर तृतीय क्रमांकाने निवडले गेले.