सुरुडी सरपंच मिनाक्षीताई सकट यांचा जातीयवादी उल्लेख; १५ ऑगस्टला झेंडावंदन न करण्याचा आरोप, अमोल पाटोळे सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची कारवाईची मागणी* --------------
सातारा जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे निवेदन सादर
19 August, 2025
सातारा दि.१९ (जरंडेश्वर समाचार):- जिल्हा अहमदनगर ,श्रीगोंदा तालुक्यातील सुरुडी गावच्या महिला सरपंच मीनाक्षीताई सकट (मातंग समाज) यांच्याबाबत घडलेल्या जातीयवादी अपमानानंतर आता त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सरपंच सकट यांच्यावर काही व्यक्तींनी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत त्या किरकोळ भाजल्या असून सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत. या घडलेल्या घटनेचा सातारा जिल्ह्यातील मातंग समाजाच्या वतीने आणि जाहीर निषेध करीत असून संबंधित लोकांच्या कडक कारवाई करण्यात यावे तसेच फास्ट ट्रॅक कोर्टात खटला तात्काळ चालवण्यात यावे. या घटनेचा जाहीर निषेध अमोल पाटोळे सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सुरेश बोतालजी प्रदेशाध्यक्ष भारतीय बहुजन सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.
ग्रामसभेत जातीयवादी उल्लेख
सुरुवातीला अलीकडील ग्रामसभेत सरपंच मीनाक्षीताई सकट यांचा त्यांच्या जातीचा उल्लेख करून अपमान करण्यात आला होता. या संदर्भात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (ॲट्रॉसिटी) पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक न करता त्याला “गाव सोडून द्या, गुप्त व्हा” असा सल्ला दिल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. त्यामुळे आरोपींना व त्यांच्या साथीदारांना धैर्य मिळाल्याचा आरोप समाजात होत आहे.
जीवघेणा हल्ला
१७ ऑगस्टच्या संध्याकाळी आरोपीच्या काही साथीदारांनी सरपंच मीनाक्षीताई सकट यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात त्यांच्या हात व अंगावरील काही भाग भाजला असून त्या उपचार घेत आहेत. घटनेवेळी त्यांच्या स्कूटीवरही पेट्रोल ओतून आग लावण्यात आली आणि ती पूर्णपणे जळून खाक झाली. या प्रकारात त्यांचा लहान मुलगा देखील जखमी झाला आहे.
पोलिसांवर ढिलाईचा आरोप
गंभीर गुन्हा घडूनही पोलिस “कासवगतीने” कारवाई करत आहेत, अशी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. आरोपींना पाठीशी घालून कायदेशीर कारवाई टाळली जात असल्याचा आरोप पीडित परिवाराने व समाजबांधवांनी केला आहे.
अमोल पाटोळे यांची कारवाईची मागणी
या घटनेची दखल घेत अमोल पाटोळे (सातारा) यांनी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या कडे निवेदन सादर करून जबाबदार पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “१५ ऑगस्टला सरपंच असूनही त्यांना झेंडावंदन करण्यापासून वंचित ठेवले गेले, जातीयवादी लोकांच्याकडून अपमान झाला, आणि आता जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला – हा सरळ लोकशाहीचा व सामाजिक न्यायाचा अपमान आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
समाजात संतापाची लाट
या घटनेनंतर मातंग समाज व स्थानिक ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप आहे. “सरपंच महिलेला जातीच्या आधारे अपमानित करून जीवघेण्या हल्ल्यापर्यंत पोहोचवले जाणे म्हणजे राज्यातील महिला सक्षमीकरण आणि आरक्षणाला थेट आव्हान आहे,” असे सामाजिक नेत्यांचे म्हणणे आहे.
केंद्रीय आयोगाकडे धाव
पीडित सरपंचांच्या वतीने केंद्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, आरोपींना कठोर शिक्षा मिळावी आणि पीडितेला सुरक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. “कायद्याचे रक्षण करणारेच जर आरोपींना पाठीशी घालत असतील तर सामान्य नागरिकांचा विश्वास कसा बकणार?” असा सवाल उपस्थित होत आहे.