महाविद्यालयांकडून अवाजवी शुल्क वसुलीवर अंकुश – विद्यार्थ्यांना ऑनलाइन तक्रार करण्याची सुविधा
शिष्यवृत्ती मिळणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शासन देत असलेल्या रकमेचा विचार करून केवळ उर्वरित शुल्कच घेण्याचे निर्देश
19 August, 2025
महाविद्यालयांकडून अवाजवी शुल्क वसुलीवर अंकुश – विद्यार्थ्यांना ऑनलाइन तक्रार करण्याची सुविधा
पुणे(जरंडेश्वर समाचार): व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशावेळी काही महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त रक्कम आकारली जात असल्याच्या तक्रारींना आता आळा घालण्यासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) नवी यंत्रणा सुरू केली आहे. मंजूर शुल्कापेक्षा अधिक पैसे आकारले गेले असल्यास विद्यार्थी थेट ऑनलाइन तक्रार नोंदवू शकतात.
शुल्क ठरविण्याची जबाबदारी FRA कडे
राज्यात अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर, मॅनेजमेंट, कॉम्प्युटर सायन्स, विधी यांसारख्या तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शुल्क निश्चितीची जबाबदारी शुल्क नियामक प्राधिकरण (Fee Regulating Authority – FRA) यांच्याकडे आहे. प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी अभ्यासक्रमानुसार शुल्क जाहीर केले जाते आणि ते महाविद्यालयांनी आपल्या संकेतस्थळावर व सूचना फलकावर मराठी आणि इंग्रजी भाषेत स्पष्टपणे दाखविणे बंधनकारक आहे.
अनधिकृत वसुलीवर कारवाई
‘डेव्हलपमेंट फंड’, देखभाल शुल्क, जादा अनामत रक्कम अशा विविध कारणांखाली काही महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क घेत असल्याचे प्रकार अधूनमधून उघडकीस येतात. FRA आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाने याबाबत कठोर भूमिका घेतली असून, मंजूर शुल्कापेक्षा अधिक आकारणी आढळल्यास संबंधित संस्थेविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, एका शैक्षणिक वर्षात केवळ त्या वर्षाचेच शुल्क आकारण्याचा नियम स्पष्ट करण्यात आला आहे. शिष्यवृत्ती मिळणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शासन देत असलेल्या रकमेचा विचार करून केवळ उर्वरित शुल्कच घेण्याचे निर्देश दिले आहेत.
विद्यार्थ्यांनी तक्रार कशी करावी?
https://portal.maharashtracet.org या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन तक्रार नोंदवता येईल.
तक्रार करताना विद्यार्थ्याचे नाव, महाविद्यालयाचे नाव, अभ्यासक्रमाचे नाव, वसूल केलेले शुल्क आणि संबंधित पुरावे (पावत्या, नोटिसा, पत्रव्यवहार) जोडणे आवश्यक आहे.
याशिवाय ७७००९१९८९४ या क्रमांकावर सकाळी १० ते संध्याकाळी ६ (सार्वजनिक सुट्ट्या वगळून) दूरध्वनीवरही तक्रार नोंदवता येईल.
पारदर्शकतेकडे एक पाऊल
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना व पालकांना दिलासा मिळणार असून, शिक्षणक्षेत्रातील पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.