साताऱ्यात आधी राष्ट्रगीत, मग पालकमंत्र्यांचा निषेध – स्वातंत्र्यदिनी अभिनव आंदोलन
जिल्हाधिकारी खुर्ची वादातून संताप; राष्ट्रगीताच्या सुरावर आंदोलकांचा पोलिसांना अडथळा
15 August, 2025
सातारा, दि. 15 ऑगस्ट :(अजित जगताप जरंडेश्वर समाचार)लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला आपले प्रश्न मांडण्याचा आणि आंदोलन करण्याचा अधिकार आहे, असे स्वतः सांगणाऱ्या राज्याचे पर्यटन व सैनिक कल्याण मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याच विरोधात स्वातंत्र्यदिनी एक अभिनव आंदोलन करण्यात आले.
तांदुळवाडी (ता. कोरेगाव) येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप जाधव यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाची भूमिका घेतली. पोलिस त्यांना ताब्यात घेण्यासाठी आले, तेव्हाच त्यांनी राष्ट्रगीत सुरू केले. राष्ट्रगीताचा मान राखण्यासाठी पोलिसांना थांबावे लागले, आणि गीत संपताच जाधव यांनी पालकमंत्र्यांच्या विरोधात घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी उपस्थित पत्रकारांनी या अनोख्या आंदोलनाचे चित्रीकरण केले.
जाधव यांचे आंदोलन हे जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातील खुर्ची प्रकरणावर आधारित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या पदाच्या सन्मानाच्या खुर्चीवर पालकमंत्री कामकाज करत असल्याची बाब त्यांना खटकली. त्यांनी पूर्वी निवेदन देऊन इशारा दिला होता; मात्र कोणतीही दखल न घेतल्याने त्यांनी खुर्ची घेऊनच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
आंदोलनादरम्यान पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले. यामध्ये गणेश वाघमारे, मनोहर सावंत, संजय गाडे, किशोर धुमाळ आदींचा समावेश होता. सार्वजनिक रस्त्याच्या मागणीसाठी आलेले नागरिक देखील आंदोलनात सहभागी झाले होते. अग्निशामक दल व पोलीस दलाने बंदोबस्त ठेवला.
आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, स्वातंत्र्यदिनीही जिल्ह्यात लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांना अडवण्यात आले, हे दुर्दैवी आहे. यामुळे साताऱ्यात विरोधी पक्ष अस्तित्वात नसल्याचे भासते, अशी टीका त्यांनी केली. यावेळी प्रसारमाध्यमांनी सामाजिक प्रश्नांबाबत जागरूकता दाखवल्याबद्दल आंदोलकांनी त्यांचे आभार मानले.