सततच्या बिबट्या हल्ल्यांमुळे नडशी परिसर भयभीत – ग्रामस्थांचा वन विभागावर रोष
नडशी येथे दुचाकीस्वारांवर बिबट्याचा हल्ला – महिला व लहान मूल जखमी
15 August, 2025
कराड दि.१५ (प्रतिनिधी जरंडेश्वर समाचार) – कराड जवळील नडशी येथे रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून जाणाऱ्या दांपत्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला. यात हर्षदा थोरात (२८) यांच्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांचा मुलगा मानस (४) देखील जखमी झाला आहे.
नडशी गाव आणि एकूणच परिसरात बिबट्याचे वारंवार हल्ले होत असून, चारच दिवसांपूर्वी मयूर गुजर यांच्या आणि पंधरा दिवसांपूर्वी समाधान माने यांच्या दुचाकीवर बिबट्याने हल्ला केला होता.
जखमींना तातडीने वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अलीकडच्या काही दिवसांत नडशी व परिसरात बिबट्याचे वारंवार हल्ले होत असून, यापूर्वी मयूर गुजर आणि समाधान माने यांच्या दुचाकींवरही बिबट्याने हल्ला केला होता.
सहायक उपवनसंरक्षक जयश्री जाधव यांनी घटनास्थळाला भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली आणि मानव-बिबट्या संघर्ष टाळण्यासाठी सूचना दिल्या. तरीही सततच्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून, वन विभागाच्या कार्यक्षमतेबाबत रोष व्यक्त होत आहे.
नडशी व लगतच्या गावांमध्ये गेल्या पंधरा दिवसांत बिबट्याचे तीन हल्ले झाले आहेत. पिंजरा व कॅमेरा ट्रॅप लावूनही बिबट्या न पकडल्याने ग्रामस्थ वन विभागावर नाराजी व्यक्त करत आहेत.
ग्रामस्थांचा आरोप आहे की पिंजऱ्यात भक्ष्यच नसेल तर बिबट्या कसा अडकणार? केवळ औपचारिकतेसाठी पिंजरा लावण्यापेक्षा प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. आता वन विभाग या जीवघेण्या समस्येवर कोणते ठोस पाऊल उचलतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.