single-post

अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी महिन्याभरात निविदा; झोपड्या हटविण्याची प्रक्रिया वेगाने

चिरानगर परिसरातील दोन भूखंडांवर हे स्मारक उभारले जाणार

17 August, 2025

मुंबई दि.१७(जरंडेश्वर समाचार):-घाटकोपरमधील चिरानगर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (झोपु प्राधिकरण) या स्मारकासाठी महिन्याभरात निविदा काढण्याचा निर्णय घेतला असून, स्मारकासाठी जागा मोकळी करण्याची कामेही लवकरच सुरू होणार आहेत.

चिरानगर परिसरातील दोन भूखंडांवर हे स्मारक उभारले जाणार असून, या ठिकाणी एकूण ६८५ झोपड्या आहेत. झोपु प्राधिकरणाने झोपडीधारकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण केले असून पात्रता निश्चितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. पात्र झोपडीधारकांना पर्यायी व्यवस्था देत झोपड्या हटविण्याचे काम महिन्याभरात सुरू केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे, अण्णाभाऊ साठे यांचे चिरानगर येथील मूळ घर जतन करण्यात येणार असून, स्मारक उभारणीच्या आराखड्यात त्याला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. हे काम दोन टप्प्यात होणार असून, निविदा प्रक्रियेच्या तयारीस प्राधिकरणाने सुरुवात केली आहे.

अण्णाभाऊ साठे स्मारकाचा निर्णय २०१७ मध्ये घेण्यात आला होता. प्रारंभी हा प्रकल्प सामाजिक न्याय विभागांतर्गत स्थापन झालेल्या स्मारक समितीच्या माध्यमातून राबविण्यात येत होता. मात्र, मार्च २०२४ मध्ये राज्य सरकारने नवा शासन निर्णय काढत हा प्रकल्प झोपु प्राधिकरणामार्फत राबविण्याचा निर्णय घेतला.