जिल्हा बँकेची वाटचाल – रोबो बँकेकडे
सातारा जिल्हा बँक केवळ आर्थिक शिस्तीचेच नव्हे, तर तंत्रज्ञान-आधारित शेती क्रांतीचे केंद्र ठरणार आहे.
17 August, 2025
सातारा दि.१८(जरंडेश्वर समाचार) –शेतकऱ्यांना वारंवार कर्जमाफी देणे हा शाश्वत उपाय नाही, तर उत्पादनक्षमतेत वाढ होणे हाच खरी कर्जमुक्तीचा मार्ग आहे, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे मार्गदर्शक संचालक आणि विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले. ते सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वार्षिक सभेत बोलत होते.
रामराजे म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना उत्पादनवाढीसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय ठिबक सिंचनासाठी जिल्हा बँकेमार्फत थेट अनुदान देण्याची योजना राबवली जाणार आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेलच, पण सातारा जिल्हा बँक जगातील सर्वांत मोठी रोबो बँक म्हणून पुढे येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ठळक निर्णय
एआय तंत्रज्ञान वापरणाऱ्या शेतकऱ्यांना बँकेतर्फे कर्जवाटप व प्रति युनिट १० हजार रुपये अनुदान.
ठिबक सिंचनासाठी शासन लॉटरी पद्धत वापरत असले तरी जिल्हा बँकेतर्फे सर्व शेतकऱ्यांना एकरी ५ हजार रुपये थेट अनुदान.
शेतीतील ऑटोमायझेशनसाठी एकरी १० हजार रुपयांचे अनुदान.
बँकेची कामगिरी
बँक स्थापनेपासून आजतागायत कायम नफ्यात.
सलग १८ वर्षे एनपीए ‘शून्य टक्के’.
वसुली टक्केवारी नेहमीच ९५ टक्क्यांपेक्षा जास्त.
सलग ‘ऑडीट बर्ग – अ’ मिळवणारी जिल्हा बँक.
मान्यवरांचे प्रतिपादन
खा. नितीन पाटील – बँकेच्या शिस्तबद्ध कामकाजामुळे सतत प्रगती साधता आली.
ना. शिवेंद्रराजे भोसले – जिल्हा बँकेच्या कामात राजकारणाला स्थान नाही. शासनस्तरीय प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू.
गौरव सोहळा
दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विकास सेवा सोसायट्यांचा गौरव करण्यात आला.
जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक – ओझर्डे (ता. वाई) येथील महात्मा गांधी विकास सोसायटी.
द्वितीय – पाडळी (ता. सातारा).
तृतीय – वाकळवाडी (ता. खटाव).
तसेच तालुकास्तरीय सोसायट्यांनाही पारितोषिके देण्यात आली.
???? या निर्णयांमुळे सातारा जिल्हा बँक केवळ आर्थिक शिस्तीचेच नव्हे, तर तंत्रज्ञान-आधारित शेती क्रांतीचे केंद्र ठरणार आहे.