महाविकास आघाडीचा पिंपोडेत ठिय्या : निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाविरोधात रास्ता रोको आंदोलन
रस्ता नाही, खड्डेच खड्डे!”; पिंपोडेत महाविकास आघाडीचा ठिय्या
17 August, 2025
सातारारोड, दि.१८ (जरंडेश्वर समाचार): खंडाळा–कोरेगाव–शिरोळ या महत्त्वाच्या राज्यमार्गाचे पिंपोडे खुर्द–कोरेगाव दरम्यान सुरू असलेले काम गेल्या वर्षभरात अत्यंत संथ गतीने व निकृष्ट दर्जाचे झाल्याने ग्रामस्थांच्या संतापाला अखेर ऊत आला. याच निषेधार्थ महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी पिंपोडे खुर्द येथे रास्ता रोको आंदोलन छेडले.
या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी केले. यावेळी तेजस शशिकांत शिंदे, साहिल शशिकांत शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
“एक वर्ष उलटले, रस्ता अजूनही अपूर्ण”
गेल्या १२ महिन्यांत पाच टक्केही काम झालेले नाही. ठेकेदार कंपनीने रस्ता खोदून ठेवला असून पळशी, रेवडी, भक्तवाडी, कोलवडी, सातारारोड, जळगाव, भाकरवाडी आदी गावांतील ग्रामस्थांना प्रचंड गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.
पावसाळ्यात खड्डे, चिखल व पाणथळ यामुळे अपघातांची मालिका सुरू असून शाळा–महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.
‘भीक मांगो आंदोलन’ ठरले आकर्षण
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी भिक्षेकऱ्यांचा पेहराव करून ‘भीक मांगो आंदोलन’ केले. ठेकेदारांच्या हलगर्जी कारभाराची खिल्ली उडवत पैसे गोळा करण्यात आले. हा उपक्रम नागरिकांमध्ये चर्चेचा व उत्सुकतेचा विषय ठरला.
“ठेकेदारावर गुन्हा दाखल करा” – सुनील माने
आंदोलनादरम्यान सुनील माने यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
> “रस्त्याच्या कामाच्या नावाखाली नागरिकांची प्रचंड फसवणूक होत आहे. ठेकेदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे हजारो जीव धोक्यात आहेत. या कामाची चौकशी करून ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा आणि रस्ता तातडीने पूर्ण करावा,”अशी मागणी त्यांनी केली.
पोलिसांना निवेदन
आंदोलनानंतर महाविकास आघाडीने वाठार स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अविनाश माने यांना निवेदन सादर केले. या निवेदनात दोषी ठेकेदारावर कारवाई व रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.
आघाडीच्या तिन्ही पक्षांची एकजूट
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या तिन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.