बावधन भैरवनाथ देवस्थानला ‘ब’ दर्जा व ५ कोटींचा निधी – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही; स्मशानभूमीसाठीही ५० लाख
17 August, 2025
वाई, ता. १८ सुरेश बोतालजी/दिलीप कांबळे (जरंडेश्वर समाचार): सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील ऐतिहासिक व धार्मिक परंपरेने समृद्ध असलेल्या बावधन गावाला विकासाचा नवा टप्पा गाठण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बगाड यात्रा आणि नवसाला पावणाऱ्या काळभैरवनाथ देवस्थानाला राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी ‘ब वर्ग तीर्थक्षेत्र’ असा दर्जा जाहीर केला असून, देवस्थानाच्या सर्वांगीण विकासासाठी तब्बल ५ कोटी रुपयांचा निधी तसेच गावाच्या स्मशानभूमीसाठी ५० लाखांचा निधी देण्याची घोषणा केली.
ही घोषणा भाजप वतीने आयोजित सत्कार समारंभ व तालुकाध्यक्ष दीपक ननवरे यांच्या वाढदिवसानिमित्त बावधन येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात करण्यात आली. यावेळी ग्रामविकास मंत्री गोरे यांच्या हस्ते दीपक ननवरे यांचा नागरी सत्कार, तसेच भैरवनाथ देवाचे प्रतीक असलेल्या बगाडाच्या प्रतिमेचा विशेष मान्यवर सत्कार सोहळा पार पडला.
संघर्षातून घडतो कार्यकर्ता – गोरे
कार्यक्रमात मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, “संघर्षातून कार्यकर्ता घडतो. दुष्काळी माण तालुक्यात मी पाण्यासाठी वर्षानुवर्षे लढा दिला आणि त्याच संघर्षातून मी मंत्रीपदापर्यंत मजल मारली. ग्रामीण विकास खात्यांतर्गत अनेक महत्त्वाच्या योजना राबवायच्या आहेत. त्या गावोगावी पोहोचविण्यासाठी माझा पूर्ण प्रयत्न राहील. भाजप कार्यकर्त्यांना ताकद व पाठबळ देणे हीच माझी भूमिका आहे, आणि यात कोणतीही तडजोड होणार नाही.”
बावधनची ओळख राज्यभरात
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बगाड यात्रेमुळे बावधन गावाला एक विशेष स्थान आहे. या यात्रेत हजारो भाविक सहभागी होतात. गावात खिलार बैलांची जोपासना ही एक जुनी परंपरा असून, त्यामुळे बावधनला ‘खिलार बैलांचे गाव’ अशी ओळख मिळावी, अशी मागणी दीपक ननवरे यांनी कार्यक्रमात केली.
ननवरे म्हणाले, “गावाने प्रदेशाध्यक्ष एन. एम. कांबळे आणि मंत्री मदनराव पिसाळ यांसारखी मोठी माणसे दिली. कार्यकर्त्यांचे पाठबळ हीच माझी खरी ताकद आहे. त्यावर गावच्या विकासाची घोडदौड सुरू राहील. बावधनची बगाड यात्रा राज्यात मोठ्या उत्साहात साजरी होते. त्यामुळे गावाचा लौकिक वाढवून त्याला विशेष मान्यता मिळाली पाहिजे.”
पिसाळ यांचे मनोगत
कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “माजी मंत्री मदन आप्पा पिसाळ यांच्या आशीर्वादाने बावधन परिसरातील जनतेची सेवा करण्याची संधी लाभली. दीपक ननवरे यांच्या बळावर व कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे वाई विधानसभा निवडणुकीत ८० हजार मतांपर्यंत मजल मारता आली. भविष्यातही समाजकार्यासाठी एकत्र राहून वाटचाल सुरू राहील.”
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमात भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, सूतगिरणीचे चेअरमन शशिकांत पिसाळ, सरपंच वंदना कांबळे, तसेच ऋषिकेश धायगुडे, विकास पवार, अतुल पवार, रोहिदास पिसाळ, विवेक भोसले, संदीप पिसाळ, चंद्रकांत भोसले, दिगंबर रासकर, सुरज कदम, तेजस मांढरे, निलेश माने यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
प्रास्ताविक सचिन भोसले यांनी केले. सूत्रसंचालन विठ्ठल माने व सुनील कदम यांनी केले. कार्यक्रमात भाजप महिला जिल्हाध्यक्ष सुरभी भोसले, ऍड. विजयसिंह पिसाळ, ऍड. विजयसिंह ठोंबरे, अंकिता कदम यांची भाषणे झाली.
विकासाची गती वाढणार
बावधन हे आधीपासूनच धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरांनी समृद्ध गाव आहे. काळभैरवनाथ देवस्थानाच्या ब वर्ग तीर्थक्षेत्र घोषणेमुळे आता यात्रास्थळाच्या विकासाला गती मिळणार असून भाविकांसाठी पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत. स्मशानभूमीसाठी जाहीर झालेला ५० लाखांचा निधी गावकऱ्यांच्या दीर्घकालीन मागणीची पूर्तता करणारा ठरणार आहे.