single-post

कोरेगावला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची गरज – सर्वसामान्यांचा हक्क”

कोरेगावला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची गरज – जनतेची एकमुखी मागणी”-सुरेश बोतालजी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार

16 August, 2025

कोरेगावला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची गरज – सर्वसामान्यांचा हक्क

सातारा जिल्हा आरोग्यसेवेच्या बाबतीत तुलनेने प्रगत असला, तरी अजूनही अनेक ठिकाणी सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या व सर्वसमावेशक आरोग्य सुविधा मिळत नाहीत. विशेषतः कोरेगाव शहर व त्याचा परिसर हा मध्यवर्ती दळणवळणाचा केंद्रबिंदू असूनही, येथे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची कमतरता तीव्रतेने जाणवते.

आज जरी  विविध  हॉस्पिटल्स अस्तित्वात असली, तरी त्यांची व्याप्ती खूपच मर्यादित आहे.

ट्रॉमा सेंटर हे अपघातग्रस्त व आपत्कालीन रुग्णांसाठी आवश्यक असते. परंतु ते उभे राहण्यास दोन वर्षे लागणार आहे, परंतु ते रुग्णांच्या विविध आजारावर उपचार करण्यास सर्वांगीण असेलच असे नाही.

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल विशिष्ट आजारांवर तज्ज्ञ उपचार देते, परंतु ते प्रचंड खर्चिक असल्यामुळे ते सर्वसामान्य जनतेला परवडणारे नाही म्हणून कोरेगाव शहरांमध्ये मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल ची खूप गरज आहे. हे एखाद्या मोठ्या उद्योजकाने सेवाभावी वृत्तीने कोरेगाव शहरांमध्ये असे हॉस्पिटल उभारण्यात यावे किंवा राज्य सरकार, केंद्र सरकार च्या लोकप्रतिनिधींनी कोरेगाव शहरांमध्ये मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल उभारून रुग्णांना दिलासा द्यावा अशी मागणी सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता करीत आहे .

या सर्व परिस्थितीत, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हेच खऱ्या अर्थाने सामान्य जनतेचे गरजवंत आरोग्य केंद्र ठरते. कारण अशा रुग्णालयात स्त्रीरोग, प्रसूतिशास्त्र, बालरोग, हाडांचे विकार, मेडिसिन, शस्त्रक्रिया, नेत्रविज्ञान अशा विविध शाखांची सेवा एकाच छताखाली मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही सेवा परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देता येते.

कोरेगाव शहराचे स्थान जिल्ह्यात मध्यवर्ती आहे. याठिकाणी जर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारले गेले, तर खटाव, मान, फलटण, सातारा, रहिमतपूर, तारगाव, वाई, खंडाळा अशा तालुक्यांतील हजारो रुग्णांना जवळपासच दर्जेदार आरोग्यसेवा मिळेल. आज या भागातील अनेक रुग्णांना,कराड, सातारापर्यंत किंवा पुण्यासारख्या महानगरांत उपचारासाठी धाव घ्यावी लागते. त्यातून वेळ, पैसा व मानसिक त्रास या तिन्हींचा मोठा बोजा उचलावा लागतो.

सध्याच्या काळात स्वस्त आणि दर्जेदार उपचार ही सर्वसामान्यांची मुलभूत गरज आहे. म्हणूनच, 'कोरेगाव शहरात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीची मागणी' ही केवळ स्थानिक लोकांची इच्छा नसून सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्यांची तीव्र गरज आहे.

राज्य सरकारने या सर्वांगीण बाबींचा गांभीर्याने विचार करून, कोरेगाव येथे धर्मार्थ तत्वावर चालणारे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय तातडीने घ्यावा. हा निर्णय घेतल्यास जिल्ह्यातील हजारो सामान्य रुग्णांचे आरोग्य सुरक्षित होईल, तसेच ग्रामीण-शहरी आरोग्यसेवेतील दरीही मोठ्या प्रमाणावर कमी होईल.