सातारा जिल्ह्यातील ऑगस्ट क्रांतीची राष्ट्रभक्तीची ज्योत निरंतर पुढील पिढ्यांनी जपून ठेवण्याची गरज : उपप्राचार्य शिवाजी राऊत
सातारा जिल्ह्याच्या 42 च्या क्रांतीची स्वातंत्र्याच्या इतिहासातील निरंतर सुवर्ण अक्षराची गौरवगाथा असून वर्तमानाच्या सर्व पिढ्यांनी सतत याचे अध्ययन व चिंतन मनन करून आपला वर्तमानातील स्वातंत्र्याच संरक्षण करण्यासाठी सतत कटिबद्ध असले पाहिजे.
14 August, 2025
सातारा दि. 14 (जरंडेश्वर समाचार)भारतीय स्वातंत्र्य लढा हा मानव मुक्तीच्या अनेक लढा पैकी एक गौरवशील भारतीयांचा लढा आहे. हे स्वातंत्र्य ही अनेक अनामिकांची व हुतात्म्यांची त्यागाची समर्पणाची स्वातंत्र्यासाठीची कृतज्ञतेची पुढील पिढ्यांसाठी इतिहास कृतज्ञता आहे. हा ऑगस्ट क्रांतीचा इतिहास हा स्वातंत्र्याच्या मूल्यांबरोबर भारतभूमीवर निरंतर गौरवाचा आणि एकात्मतेचा इतिहास म्हणून भारतीयांना निरंतर जपण्याचा संकल्प करावा लागेल. यातील सातारा जिल्ह्यातील ऑगस्ट क्रांतीची राष्ट्रभक्तीची ज्योत निरंतर पुढील पिढ्यांनी जपून ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी स्वातंत्र्यरक्षणासाठी सतत कटिबद्ध राहण्याचे आवाहन स्वीकारले, तरच ऑगस्ट क्रांतीचे कृतज्ञभान वर्तमानातील पिढ्या बाळगतात हे सिद्ध होईल .असे उद्गार चले जाव चळवळ "स्मारक समिती सातारा चे कार्यकर्ते शिवाजी राऊत यांनी काढले.
रयत शिक्षण संस्थेच्या इस्माईल साहेब मुल्ला लॉ कॉलेजच्या ऑगस्ट क्रांती दिन एक इतिहास या विषयावरील विशेष व्याख्यान प्रसंगी राऊत हे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापिका पाटील या होत्या. प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील व इस्माईल साहेब मुल्ला यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण व अभिवादन करून व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना व्याख्याते शिवाजी राऊत लिखित एकात्मिक शिक्षण ही पुस्तके विद्यार्थी व विद्यार्थिनीना भेट देऊन व्याख्यानास प्रारंभ झाला.
आजच्या वर्तमानातील स्वातंत्र्याचा अवकाश संकुचित होत असताना स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास हा निरंतर भारतीयांच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा कृतज्ञतेचा विषय असला पाहिजे असे सांगून राऊत म्हणाले ,की भारत हा राष्ट्र म्हणून स्वातंत्र्य चळवळीतूनच देश साकारला आहे या देशाचा राष्ट्रवादाचा पाया स्वातंत्र्य चळवळीने घातला आहे. यामध्ये अनेकांच्या योगदानात चा उल्लेख करून ते म्हणाले की 42 चा चलेजाव क्रांतीचा लढा हा सातारा जिल्ह्याने केवळ वंदनीय म्हणून जपला नाही, तर त्यात यथार्थ योगदान दिले आहे .दहा ऑगस्ट 1942 ला साताऱ्यात गांधी मैदानावर गणपतराव तपासे इतर सर्व 2000 नागरिकांची एक सभा झाली सायंकाळच्या या सभेमध्ये यादव गोपाळ पेठेतून 500 विद्यार्थ्यांची फेरी सिटी पोस्टाकडे काढण्यात आली होती 6:45 वाजता गोऱ्यांनो भारतातून चालते व्हा व महात्मा गांधी की जय अशा घोषणांनी रान पेटवण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांनी फेरीतील नागरिकांना पांगवण्यासाठी बळाचा वापर केला होता. नऊ ऑगस्ट रोजी सातारा जिल्ह्यात 167 प्रभात फेऱ्या गावागावातून काढण्यात आल्या होत्या ."करेंगे या मरेंगे" या घोषणा जिल्ह्याचा आवाज बनल्या होत्या. त्या घुमत होत्या. या ऑगस्ट क्रांतीचे नायक दिवंगत यशवंतराव चव्हाण, काशिनाथ देशमुख, विठोबा घाडगे, कदम ज्ञानोबा कुदळे, तुकाराम बलभीम कुलकर्णी ,लक्ष्मण गणेश पाटील ,दत्तू बळवंत, के डी पाटील ,नाना पाटील, निवृत्ती आकाराम पाटील, पांडू मास्तर, रंगराव विठ्ठल पाटील, रामचंद्र चंदू पाटील, वसंत दादा पाटील ,स्वामी रामानंद भारती, गौरीहर सिंहासने ,यशवंत कृष्णा सोहनी ,शामराव अण्णा निकम, पांडुरंग विठ्ठल भोसले, बाबुराव गंगाधर चिकटे, चरणकर ,आर्यन जोशी, गणपत रामचंद्र पाटील, बापू कचरे, यांच्या प्रयत्नातून सातारा जिल्ह्यात फेऱ्या सभा ,भंडारे, कीर्तने, कुस्त्याची मैदान, गावच्या यात्रा ,साप्ताहिक बाजार, असे अनेक कार्यक्रम घेऊन ब्रिटिशांच्या विरुद्ध नागरिकांना चेतावण्याचे काम या स्वातंत्र्यसैनिकांनी ऑगस्ट क्रांतीमध्ये केले होते. गांधी काय म्हणतात? हे ऐकण्यासाठी सातारा जिल्हा गोळा झाला होता. गांधी यांच्या बद्दलची सातारा जिल्ह्यातील भक्ती आणि तो भाव हा अनोखा होता. असे सांगून शिवाजी राऊत पुढे म्हणाले ,की प्रत्येक भारतीय हा स्वतंत्र आहे .आणि या आणीबाणीच्या प्रसंगी देशासाठी जो करेल किंवा जो मरेल हेच देशाचे स्वातंत्र्य आहे .हीच राष्ट्र प्रेमाची ज्योत आहे. हे भारावलेले वातावरण 9ऑगस्ट क्रांतीने सातारा जिल्ह्यात तयार केले होते. या लढ्यात शंकरराव निकम या शाहीरचे पोवाडे शेलार मामा यांचे कीर्तन गावोगावी आयोजित करण्यात येत असे .
24 ऑगस्ट 1942 ला कराडच्या तहसीलदार कार्यालयावर तिरंगा झेंडा फडकवण्यासाठी बाळकृष्ण आनंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता .वकिलांनो कोर्टाचे काम थांबवा, नोकरांनो आपली नोकरी सोडा, अशा घोषणा हा मोर्चा देत होता शिरगाव ,इंदोली ,काले, तांबवे ,उंडाळे येथे फेऱ्या काढण्यात आल्या होत्या. पोलीस सभेवर झडप घालत होते. कराडच्या मोर्चातील दाजी मुळे ,पांडुरंग नाना देशमुख यांना पोलिसांनी बंदुकी च्या गुस्त्याने जखमी केले होते.
सांगली सातारा जिल्ह्यातील ऑगस्ट क्रांतीतील अनेक घटनांचा संदर्भ देऊन राऊत आपल्या भाषणात पुढे म्हणाले ,की इस्लामपूरचा मोर्चा याचा इतिहास मोठा आहे .ताकारी ते बी सरू या रेल्वे मार्गावर बारा गोष्ट 1942 रोजी टेलिग्राम च्या तारा तोडण्यात आल्या होत्या. सदर मराठा रेल्वे ला 68 वेळा घातपात घडवण्यात आला होता .विश्रामबाग रेल्वे स्टेशन या ठिकाणीही विध्वंस करण्यात आला होता .या सर्व कारवायांमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिवीर नागनाथ नाईकवाडी ,जी डी बापू यांनी तर स्पेशल ट्रेन लुटली होती सहा जून 1943 रोजी कुंडल ते मिरज वरून जाणारी स्पेशल ट्रेन लुटण्याबाबत नियोजन केले गेले होते.
सात जून 1943 रोजी शेनोलीच्या उत्तरेस पन्नास भूमिगत प्रतिसरकारच्या सेनानींनी रेल्वे गाडीत बसून बिचूरच्या बोगद्यात ते आले असताना धाक दाखवून पैशाच्या पेट्या लुटल्या त्यात 11175 रुपये निघाले प्रतिसरकारचा हा शौर्याचा इतिहास ब्रिटिश साम्राज्यवादाविरुद्धचा असंतोष आजच्या पिढ्यांनी समजावून घेणे खूप महत्त्वाचे आहे .
ऑगस्ट क्रांतीच्या सातारा जिल्ह्यातील नायक क्रांतिसिंह नाना पाटील, किसनवीर हे असून त्यांचे तुरुंग फोडणे कार्यकर्त्यांच्या सुटका करणे, जन संघटन करणे, ब्रिटिशांना नामोहरण करणे, फरारी पथक स्थापन करणे, लोकांना निर्भय बनवणे, घातपात पत्रके व बुलेटीन वाटणे. हे सर्व कार्य ऑगस्ट क्रांतीतील रोमांचकारी होते.
हा ऑगस्ट क्रांतीचा इतिहास भूमिगत आंदोलन व प्रति सरकार यांच्या शौर्याची गाथा स्वातंत्र्य उत्तर काळातील निरंतर कृतज्ञतेचा इतिहास म्हणून ज्ञान क्षेत्रात शिक्षण क्षेत्रात सतत जपून ठेवली पाहिजे. असेही शिवाजीराव यांनी याप्रसंगी सांगितले .
सातारा जिल्ह्याच्या वर्तमानातील राज्यकर्त्यांनी युवकांनी संघटनांनी , चळवळीनि प्रति सरकारचा इतिहास सतत अभ्यासला पाहिजे. असे सांगून राऊत म्हणाले ,की एक जून 1943 रोजी कामेरी गावात बैठका घेऊन नाना पाटील हजर नसताना गौरीहार सिंहासने यांच्यासह किसनवीर, तात्या बोराटे ,बापूराव शिंदे ,दादासाहेब साखा वळकर ,कासेगावकर वैद्य, माधवराव जाधव, तानाजी पेंढारकर ही मंडळी एकत्रित आली होती आणि त्यांनी ब्रिटिशांनी लादलेले दंड नाकारण्यासाठी जन आंदोलन पेटवले होते
भूमिगतांना बदनाम करण्यासाठी पकडून देण्यासाठी तत्कालीन फंद फितुरी करणारे प्रवृत्ती ही या जिल्ह्यात होती .यांच्यावर दहशत बसवण्यासाठी प्रति सरकारचा पतऱ्या ठोकण्याचा ही प्रयत्न चालू होता. 1943 ते 1945 या काळात भूमिगत त्यांनी जी डी बापू लाड यांच्या नेतृत्वाखाली 300 भूमिगत एकत्रित करून मोर्चे काढले होते. हे कामही कासेगावकर वैद्य करत होते. हा इतिहास हा कॉम नाना पाटलांचा स्वतंत्र संस्थाना सारखा प्रति सरकारचा प्रयोग हा ज्वलंत राष्ट्रभक्तीचा इतिहास म्हणून समजावून आजच्या युवकांनी घ्यावा. असेही आवाहन राऊत यांनी याप्रसंगी केले .
राऊत आपल्या भाषणात पुढे म्हणाले, की सातारा जिल्ह्यातील जनतेने भूमिगत कार्यकर्त्यांचे संरक्षण केले त्यांना भाकरी देणे. हे काम जिल्ह्यातील स्त्रियांनी केले होते. हा ही स्त्रियांचा स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग महत्त्वपूर्ण ठरतो असे सांगून ते पुढे म्हणाले, की सातारा जिल्ह्यातील भूमिगतांचे आंदोलन सर्वत्र पसरू लागले होते. म्हणूनच त्यात बरडे मास्तर, बाबुराव चरणकर, नाथाजी लाड ,कासेगावकर वैद्य ,किसनवीर ,डी जी देशपांडे ,पांडू तात्या बोराटे, हे सगळे भूमिगत मुंबईच्या स्वातंत्र्य योद्धांशी जोडले गेले होते आणि त्यांच्यावर जनतेला संघटित करणे संपर्क साधने गटांशी बोलणे ही कामे सोपवण्यात आली होती.
६ मे 1944 ला गांधीजींची सुटका आगाखान पॅलेस मधून झाल्यानंतर प्रति सरकारची ही तुफान सेना जातीय ऐक्य निर्माण करणे ,अस्पृश्यता निर्मूलनाला सुरुवात करणे, दारूबंदी करणे, ग्रामोद्योग सुरू करणे. खादीचा प्रसार करणे, ग्रामीण आरोग्य सुधारणे. मूलभूत शिक्षण सुरू करणे. प्रौढ शिक्षण वर्ग चालू करणे. रहिवाशांची सेवा करणे. राष्ट्रभाषेचा प्रचार करणे. भाषेवर प्रेम करणे. असे गांधींनी दिलेल्या वीस कलमी कार्यक्रमाचा अंमल सातारा जिल्ह्यामध्ये या स्वातंत्र्यसेनानींनी तेव्हा सुरू केला होता. ते कार्य आजही वंदनीय आहे हे समजावून घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राऊत यांनी याप्रसंगी केले.
सविनय कायदेभंगाची चळवळ ही सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात इतिहास घडवून गेली आहे. असे सांगून राऊत म्हणाले, की शस्त्राचा मार्ग गांधीजींच्या सूचनेनुसार सोडून देणारे स्वातंत्र्य सेनानी यामध्ये किसनवीर, पांडू मास्तर, निवृत्ती काका, बाबुराव चरणकर ,गणपत रामचंद्र पाटील ,मारुती ज्ञानू कदम, दत्तू विठ्ठल सोनार, दत्तू बाळू लोहार ,बाबुभाई हसन मुलांनी या सर्वांनी 21 व 22 ऑक्टोबर 1944 रोजी स्वतःहून पोलिसात हजेरी लावून शरणांगती पत्करली होती आणि गांधीजींच्या सूचनेनुसार शस्त्राचा मार्ग सोडून दिला होता. हा इतिहास आज कोण समजावून घेणार ?असा प्रश्न उपस्थित करून राऊत म्हणाले की हा सर्व इतिहास ही सातारा जिल्ह्याच्या 42 च्या क्रांतीची स्वातंत्र्याच्या इतिहासातील निरंतर सुवर्ण अक्षराची गौरवगाथा असून वर्तमानाच्या सर्व पिढ्यांनी सतत याचे अध्ययन व चिंतन मनन करून आपला वर्तमानातील स्वातंत्र्याच संरक्षण करण्यासाठी सतत कटिबद्ध असले पाहिजे.
सांगली सातारा जिल्ह्याच्या एकत्रित 42 क्रांतीचे योगदान हे बहुविस्तृत असून त्यातील त्यापैकी वडूजचा मोर्चा हा एक आहे. . 3 सप्टेंबर 1942 ला तासगाव कचेरीवर मोर्चा काढण्यात आला होता. त्यास यश मिळाले होते. त्याचीच प्रेरणा घेऊन वडूच्या कचेरीवर गौरीहर सिंहासने ,रामभाऊ नलवडे, माणिकचंद दोशी, बंडोपंत लोमटे, बापू कचरे यांनी अनेक गावांना भेटू देऊन मोर्चाचे महत्त्व कथन करून 9 सप्टेंबर 42 ला यशवंतराव चव्हाण यांनी संयोजित केलेल्या परशुराम घारगे यांच्या नेतृत्वाखालील मोर्चाचा इतिहास हा सातारा जिल्ह्याच्या 42 च्या क्रांतीतील एक अनमोल क्षण होता निरंतर राष्ट्रभक्तीसाठी मरण पत्करणारा इतिहास आहे.
याबाबत विस्तृत वर्णन करताना राऊत यांनी सांगितले. की वडगावचे बंडोपंत लोमटे यांनी जी वी अंकली या मामलेदारा बरोबर व के बी बेंडीगिरी या फौजदारा बरोबर चर्चा करून मोर्चा काढण्याचे तारीख व वेळ सांगितली होती आणि त्यातूनच खटाव तालुक्यातील अनेक स्वातंत्र्यसेनानींनी 1940 मध्ये आपण काही करू शकलो नाही. म्हणून मातृभूमी विषयीची निष्ठा व्यक्त करण्यासाठी मोर्चा संयोजित केला होता. या मोर्चा चा इतिहास अंगावर शहरा आणणारा आजही असल्याचे सांगून राऊत म्हणाले, की 9 सप्टेंबर 1942 रोजी बैलगाडीत बसून डोक्यावर गांधी टोपी घालून काँग्रेसचा तिरंगा झेंडा हातात घेऊन परशुराम घारगेसह अनेक जण वडूजच्या तीर्थक्षेत्राकडे निघाले होते.
सत्याग्रह करणार होते .सोबत खेड्यातील दोन हजारापेक्षा अधिक लोक आले होते. त्यांनी हातात काट्या, दगड, कुऱ्हाडी भाले ही शस्त्रे आणली होती. नदी जवळ मोर्चा अडवण्यात आला होतामोर्चेकरी हळूहळू कचेरीकडे चालू लागले होते .ठीक अडीच वाजता मोर्चा कचेरीवर पोहोचला होता. मामलेदार आणि पीएसआय बाहेर आले .पुढेपरशुराम घारगे होते." खबरदार पुढे येऊ नका" कचेरी पासून 300 यारडा वर मोर्चेकरी थांबले होते. घारगेयांच्या सोबत बंडोपंत लोमटे यांची दोन मुले अशोक व अरविंद ही उभी होती. कचेरीवर झेंडा लावण्याची आमची इच्छा आहे. असे घाडगे यांनी सांगितले मामलेदार म्हणाले, झेंडा लावू देणार नाही. "तुम्ही परत जाणे बरे "हे ऐकताच परशुराम घारगे शांतपणे म्हणाले ,हवे तर तुम्ही आमच्यावर लाठीमार करा .किंवा आम्हाला कैद करा, किंवा तुम्ही आमच्यावर गोळीबार करा. पण आम्ही तूसुबरही मागे फिरणार नाही. हे ऐकताच "परत फिरा" "परत फिरा "अशी मामलेदारने समज दिली. तरीही मोर्चा एक फुटभर अंतरावर पुढे आला .फौजदारने त्यांना सांगितले तुमच्यावर गोळ्या झाडण्यात येतील. "परत फिरा "असा बे डीगिरीच्या आवाज आला. ोर्चेकर्यांनी प्रतिसाद दिला नाही. परिणामी गोळीबार सुरू झाला फौजदाराने रिव्हलवर मधून नऊ गोळ्या व पोलिसांनी आपल्या बंदुकीतून 38 ोळ्या मोर्चेकर्यांवर झाडल्या. मोर्चेकरी घाबरून पालथे पडले. जीवाच्या भीतीने पळू लागले. परंतु परशुराम घारगे मात्र हातात काँग्रेसचा झेंडा घेऊन साम्राज्यवाद्यांच्या गोळ्या मोठ्या धैर्याने आपल्या छातीवर झेलण्यासाठी उभे होते. दोन गोळ्या त्यांच्या छातीतून आरपार गेल्या." अहिंसेचा हा पुजारी खाली कोसळत असताना. त्याचा डावा हात उजव्या छातीवर होता आणि स्वातंत्र्याचे सौभाग्य काँग्रेसचा तिरंगा झेंडा त्याच्या उजव्या हातात स्थिर होतात" तिसरी गोळी सुसू करत आली आणि डोक्याच्या चिंधड्या उडून निघून गेली .परशुराम घारगे जमिनीवर कोसळले . त्यांच्यासोबत असलेल्या हुतात्म्या वीर बहादुरांची नावे सांगताना राऊत म्हणाले की हे अनामिक हुतात्मे किसन बंडू भोसले, रामा कृष्णा सुतार, बाळकृष्ण दिगंबर खटावकर ,बलभीम हरी खटावकर, सिद्धू भिवा पवार, खाशाबा मारुती शिंदे, श्रीरंग भाऊ शिंदे यांच्यासह 23 मोर्चेकरी जखमी झाले होते. त्यांना सातारच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रसंगी जखमी झालेले रामचंद्र बाळा घाडगे ,अशोक बंडोपंत लोमटे ,धोंडीराम रामचंद्र लोमटे, शिधा तुकाराम घारगे, आनंदा श्रीपती गायकवाड ,लक्ष्मण जयराम गायकवाड, मारुती सिधू माने, शंकर श्रीपती घारगे, रघुनाथ हरी कांबळे, पांडुरंग दत्तात्रेय वडगावे ,जगन्नाथ बाळा पंत, अरविंद बंडोपंत लोमटे, उद्धव गोविंद लोमटे, अंतु तुकाराम गुरव, दादा मारुती घाडगे, गोविंद राजू न्हावी ,नबी उस्मान शिकलगार, ज्योती हरी भोसले, सिदु केसू मोरे ,जगु मारुती यादव, काशिनाथ न्यानोबा टाकणे, हे जखमी झालेले स्वातंत्र्य सेनानी यांना उपचारार्थ आप्पासाहेब पंत व नलिनी पंथ यांनी त्यांच्या शरीरावर उपचार केले होते. हा सगळा रोमांचकारी इतिहास ही ऑगस्ट क्रांतीची महती आहे. असे सांगून ,राऊत शेवटी म्हणाले, की आजच्या स्वातंत्र्याचे रक्षण, जगण्याचे स्वातंत्र्य, भाकरीची स्वातंत्र्य ,कामाचे स्वातंत्र्य ,संघटनाचे स्वातंत्र्य रक्षण, विचाराचे स्वातंत्र्यरक्षण, समता प्रस्थापितकरण्याचे स्वातंत्र्य. दारिद्र्य निर्मूलन करण्याचे आणि एकात्म भारत भारत अभंग ठेवण्याचे स्वातंत्र्य हे आजच्या पिढ्यांवरील जबाबदारी आहे.
ही जबाबदारी इतिहासाचे आकलन करून घेऊन आपण समजावून घेतली. तरच हा भारताच्या बहुत सांस्कृतिक आणि नवराष्ट्रवादाचा प्रवास करणाऱ्या भारत निर्माण करता येईल. तो इतिहास टिकून राहील आणि भारत हे राष्ट्र स्वातंत्र्य चळवळीच्या त्यागाच्या इतिहासातून स्थापन झालेले व पुढे वाटचाल करीत असलेले हे राष्ट्र आहे .हे स्वातंत्र्याचे भान जपले पाहिजे. त्यासाठीयोगदान दिले पाहिजे. हीच ऑगस्ट क्रांती आहे आणि 15 ऑगस्ट 2025 चा भारताचा स्वातंत्र्य दिन समजावून घेतला पाहिजे. यासाठीच सातारा जिल्ह्यातील ऑगस्ट क्रांती दिनाचे महत्त्व भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वश्रेष्ठ आहेच त्या जिल्ह्यातील आजचे शिक्षण क्षेत्रातील युवकांनी, नागरिकांनी ,महिलांनी , युवतीनी, आपल्या पूर्वजांचे समर्पण समजावून घेण्यासाठी व तो इतिहास अभ्यासण्यासाठी आज ऑगस्ट क्रांती ही ज्ञानाचा विषय आपण बनवला पाहिजे. असे सांगूनही राऊत यांनी सातारा नगर परिषदेने गांधींना मानपत्र दिले होते. याचीही आठवण करून दिली. सातारा जिल्ह्यातील अंदमान निकोबार येथे सर्वात जास्त कारावास भोगणारे थोर वंदनीय स्वातंत्र्यसेनानीडॉ हकीम यांना सातारा जिल्ह्याने कधीच विसरू नये. अशी मनोमन अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली.
इस्माईल साहेब मुल्ला लॉ कॉलेज सातारा च्या डॉक्टर दीपा पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व व्याख्या यांचा परिचय करून दिला व स्वागत केले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी राजे भोसले एस एस यांनी उपस्थितांचे विद्यार्थ्यांचे प्राध्यापकांचे आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन झीनत मुल्ला व आकांक्षा गुरव या दोन विद्यार्थिनींनी केले .कार्यक्रमास विधी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते अत्यंत भारावलेल्या इतिहास कथन व्याख्यानास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.