फलटणच्या श्रेयस पाटीलची ७ लाखांच्या पॅकेजवर टाटा टेक्नॉलॉजीजमध्ये निवड
14 August, 2025
फलटण दि.१४(जरंडेश्वर समाचार):-फलटण एज्युकेशन सोसायटी संचालित कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, फलटण येथील कम्प्युटर विभागाचा विद्यार्थी श्रेयस पाटील याची टाटा टेक्नॉलॉजीज या प्रतिष्ठित कंपनीमध्ये वार्षिक ७ लाख रुपयांच्या पॅकेजसह नोकरीसाठी निवड झाली आहे.
या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, विद्यार्थ्यांच्या मेहनतीसोबतच महाविद्यालयाच्या दर्जेदार शिक्षणाची आणि उत्कृष्ट प्लेसमेंट सुविधांचीही पुन्हा एकदा पुष्टी झाली आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोजकुमार दळवी यांनी सांगितले की, आम्ही विद्यार्थ्यांना उत्तम प्रशिक्षण आणि उद्योगविश्वातील स्पर्धात्मक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी योग्य संधी उपलब्ध करून देतो. त्यातूनच आमच्या विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी मिळतात."
श्रेयसच्या या यशाबद्दल त्याचे अभिनंदन फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम आणि प्राचार्य डॉ. मनोजकुमार दळवी यांच्यासह सर्व मान्यवरांनी केले.
महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नेहमीच कटिबद्ध राहून काम केले आहे, हे श्रेयसच्या यशातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.