साताऱ्यात डॉल्बी मालकाची जिरवली;आरटीओसह पोलिसांची कारवाई
डॉल्बी अन् लेझर लाईट जप्त; डॉल्बीच्या दणदणाटाला एसपींचा दणका
12 August, 2025
सातारा दि.१२ ज्ञानेश्वर भोईटे (जरंडेश्वर समाचार) :- सातारा हा पेन्शनरांचा म्हटलं जातं. पण श्री गणेश आगमन मिरवणुकीवेळी साताऱ्यात कर्णकर्कश डॉल्बीच्या भिंती अन लेसर लाईट लागली. तसं रंगबेरंगी लाईटच्या उजेडात तरुणाईची पावले थिरकू लागली. हे एक दोन तास नव्हे तर रात्रीच्या दहा वाजेपर्यंत डॉल्बी गणरायाच्या आगमन मिरवणूकवेळी वाजली. गेल्या चार दिवसांपूर्वी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी डॉल्बी नियमातच वाजवा अन लेसर लाईटला बंदीच राहील असे सुनावले. तरीही निर्ढावलेले डॉल्बीधारक यांनी त्यांच्या सूचनांची वळकटी केली होती. त्यामुळे रात्री दहा ते दोन वाजेपर्यत पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांच्या सूचनेनुसार सातारा शहर पोलिस अन शाहुपूरी पोलिसांनी डॉल्बी अन लेझर लाईटवर विविध कलमान्वये कारवाई करत त्यांचा पूरता नांगाच जिरवला.
गणेश आगमन सोहळ्यादरम्यान मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावणे, लेजर लाईटचा वापर करणे तसेच वाहतूकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी रंजनीकांत चंद्रकांत नागे (वय ४१, रा. मल्हार पेठ), धीरज रमेश महाडिक (रा. कला व वाणिज्य कॉलेज जवळ सातारा), दीपक राजेंद्र जगताप (रा. इंद्रायणी नगर, भोसरी पुणे) व हर्षल राजाराम शिंदे (रा. पाटखळ, ता. सातारा) या चौघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश आगमन सोहळ्यादरम्यान पोलिसांनी दिलेल्या निर्देशाचे पालन करण्याच्याा सूचना यापूर्वीच गणेशोत्सव मंडळ व ध्वनिक्षेपक यंत्रणांच्या मालकांना दिले होते. तरीही गणेश मंडळांच्या ध्वनिक्षेप यंत्रणांचा आवाज मर्यादेत नव्हता.
देवी चौक येथे मिरवणूक आल्यावर टॅक्टर चालक हर्षल शिंदे व रजनी साऊंडचे मालक रजनीकांत नागे यांनी ट्रॅक्टर ट्रॉलीचे बाहेर लोखंडी ॲंगल लावल्याचे तसेच मोठ्या प्रमाणात ध्वनिक्षेपकाचा कर्णकर्कश आवाज केला असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यावरुन ट्रॅक्टरचे ट्रॉलीवर धीरज महाडिक व दीपक जगताप यांनी बीम लाईट तसेच एलइडी स्क्रीन ही लोकांचे डोळ्यास त्रास होईल,अशा पद्धतीने लावली होती. यामुळे रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना अटकाव होत होता. डॉल्बीधारक नागे यांनी पोलिसांनी दिलेल्या आदेशाची अवज्ञा केली.
श्री गणरायाची प्रतिष्ठापना गणेश चुतर्थी दिवशी म्हणजे बुधवार, दि. २७ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. पण अलिकडच्या काळात गणराया आगमन मिरवणूक सोहळ्याचं भलतंच फॅड वाढलं गेलं आहे. धार्मिक वातावरण अन उत्सव म्हणून हे योग्य असेल. लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणाऱ्या उत्सवाला मात्र, गणेश मंडळांच्या पदाधिकारी अन कार्यकर्त्यांनी याचा संपूर्ण नूरच बदलून टाकला आहे. गणेशोत्सव हा एकतेचे अन एकात्मतेचे प्रतिक समजले जात आहे. या उत्सवात सर्व जातीधर्माचे लोक एकत्रित येवून गणरायाची प्रतिष्ठापना करत उत्सव साजरा करताना मांगल्य जपत असतात. पण आता आगमन मिरवणूकीवेळीच डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजाने दंगा होत आहे. त्यावेळी हिंदू धर्मियांचा उत्सव कुठे नेवून ठेवलाय असं म्हणण्याची वेळ आली आहे.
सातारा शहरात गणेश आगमन मिरवणूकीसाठी दोन गणेशोत्सव मंडळांनी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. पण पोलिसांनी परवानगी ही नाकारली. मात्र, तरीही गणेश मंडळांनी डीजेच्या दणदणाटात सायंकाळी साडेसहा वाजता राजवाडा येथून मिरवणूकीस सुरुवात केली. हळूहळू डॉल्बीच्या दणदणाटावर तरुणाई थिरकू लागली. यामध्ये डॉल्बीधारकाने ट्रॅक्टरमध्ये वीस बाय वीसचे स्ट्रक्चर करत डॉल्बीची भिंतसह लाईट उभारली. हे स्ट्रक्चर उभारताना वरील वीजेच्या तारा धोकादायक ठरु शकतात का? याचाही विचार करण्यात आलाच नव्हता. शाल्फी व्हाईट लाईट या लेझर लाईटप्रमाणेच नागरिकांच्या डोळ्यांना इजा पोहोचवू शकत होत्या. त्यामुळे लाईट, स्ट्रक्चर अन डॉल्बी अशा चार जणांवर शाहुपूरी पोलीस अन सातारा शहर पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली.
या डॉल्बीचा दणदणाट रात्री दहा वाजेपर्यंत सुरु होताच पण त्यापूर्वीच पावणेदहा वाजता पोलिसांचा लवाजमा पाहता डॉल्बीधारकांने स्वत:हून दहा वाजण्यापूर्वीच डॉल्बी बंद केला. त्याच कारणही घडलं असंच साध्या वेशातील पोलिसांनी देवीचौकात डॉल्बीचा वाढलेला आवाज कमी करण्यास डॉल्बीधारक रजीनकांत नागे यांना सांगितला. परंतु ऑपरेटरला आवाज कमी करण्यास सांगण्याऐवजी वाढवण्यास सांगितले. त्याचवेळी कारवाईची सुत्रे वेगवान झाली. अन थाटामाटात सुरु असलेली डॉल्बीची वरात पोलीस ठाण्याच्या दारात न्यावी लागली. याच दरम्यान, सातारा शहर पोलिस ठाण्याचे पो.नि. राजेंद्र मस्के यांनी आरटीओ दशरथ वाघोले यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर कारवाई गतीमान झाली. आरटीओंच्या पाहणीनुसार संबंधित ट्रॅक्टर हा पंधरा वर्षापुढील असल्याचे आढळले. याशिवाय या ट्रॅक्टरवर ज्या डॉल्बी अन लाईटच्या भिंती उभारली होती. ती ही पूर्णत: नियमबाह्यच आहे. त्यामुळे या ट्रॅक्टरवर आता आरटीओच्या नियमानुसार कारवाई होणारच आहे. त्यामुळे याबाबतचा दंड तीन ते साडेतीन लाखापर्यंत होणार असल्याचे सांगण्यात आले.
या डॉल्बीच्या कारवाईत जप्त करण्यात आलेले ट्रॅक्टर, जनरेटरची मॉडीफय केलेली गाडी अन आवाजाचे बॉक्स सर्वच पोलीस हेडर्क्वाटरमध्ये ठेवण्यात आले आहे. याशिवाय या डॉल्बीमध्ये पुणेकर यांची लाईटची थप्पी अन डीजे सिस्टीम होती. हे सर्व पोलिसांनी तपासणी पाहिल्यानंतर त्यावर जोरदार कारवाई केली आहे. त्यामुळे पुणेकर आता यापुढे साताऱ्यात जावून डीजे वाजवणे अन लाईट लावणे हा मनात सुध्दा विचार करणार नाही, असेच दोषारोपपत्र शाहुपूरी पोलीस ठाण्याचे सचिन म्हेत्रे यांनी त्यांच्या हद्दीत गणेशोत्सव मंडळ आहे म्हणून केले आहे. तर सातारा शहर हद्दीत डॉल्बीचा नियमबाह्य दणदणाट असल्यामुळे अशी दोघांनी संयुक्तपणे कारवाई केली आहे. याबाबतचे दोषारोपपत्र लवकरच न्यायालयात पाठविण्यात येणार आहे. यामध्ये डॉल्बीधारक यास दंडाची शिक्षा जास्तीत जास्त कशी होवू शकेल, याबाबत पोलिसांनी प्रथमच भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.
डॉल्बीधारकांनी चारबेस अन चार टॉप लावून कर्णकर्कश आवाजाने सातारकरांच्या कानठळ्या बसवल्या. वास्तविक आता आवाजाच्या मर्यादा न पाळणाऱ्या डॉल्बीवाल्यांचे साहित्य पोलीस हेडक्वॉटर्रला असले तरी त्याच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यापेक्षा ते संपूर्णपणे पावसात भिजून जावू द्या, त्याचे निसर्गाने नुकसान केले की, मगच आवाजाची मर्यादा का? ओलांडली याच आत्मचिंतन होईल, असे ही आता सातारकरांमधून बोलले जावू लागले आहे. डॉल्बीमध्ये इटली या देशातून साउंड आणला आहे. या न अशाच काहीतर चर्चा घडवत राहीला आहे. याशिवाय त्या डॉल्बीपुढे किंग ऑफ सातारा नावाचा बोर्ड लावणे म्हणजे साताऱ्यातील दोन्ही राजांपेक्षा वेगळी बिरुदावली म्हणायचं की काय? इथंपर्यत या डॉल्बीवरील कारवाईनंतर चर्चा होवू लागल्या आहेत.
पोलिसांनी गणेश आगमन सोहळ्यानिमित्त केलेली कारवाई स्वागतार्ह आहेच. पण यामध्ये सातत्य असले पाहिजे, अशी भावना सातारकरांच्यामधून व्यक्त होवू लागल्या आहेत.
*दोषारोपपत्राबाबत सातारकरांमध्ये उत्सुकता*
पोलिसांची कारवाई ही बुलेटच्या कर्णकर्कश सायलन्सरप्रमाणे एक दिवसापुरती असू नये. या कारवाईमध्ये सातत्य हवं आहे. सातारा शहरात गुटख्याची कारवाई अनेकदा होते. पण चांगल्या गुटख्याची कुठं कशी विल्हेवाट लावायची हे पोलीस प्रशासनाला चांगल ज्ञात असतं. या कारवाईत लाल गुटखा व्हीडीओच्या माध्यमातून जप्त होतो कसा? याचही तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार याप्रमाणे असते. त्यामुळे डॉल्बीवर कारवाई अन न्यायालयात पाठवलं जाणारं दोषारोपपत्र कसं असणार याबाबत सातारकरांमध्ये उत्सुकता दिसू लागली आहे.
मॉडीफाय गाड्यावर हवं कारवाईचे सातत्य*
सातारा जिल्ह्यातील मूळच्या मालवाहतूक गाड्यांमध्ये मॉडीफाय करत डॉल्बी व्यवसाय सुरु करण्यात आला आहे. त्या गाड्यांना मूळत: कोणतीही परवानगीच नाही. अशा गाड्या रस्त्यावर सातत्याने धावत असतात. वास्तविक आरटीओच्या वाहतूक नियमानुसार किमान १ लाखाचा दंड तरी होवू शकतो. पण कारवाईत फारस सातत्य नसतं ही दुर्देवाची बाब आहे. वास्वितक कारवाई करताना मूळ स्वरुपात गाडी असल्यानंतरच दंड घेतला जाणे गरजेचे आहे. अन पुढे पुन्हा गाडी मॉडीफाय झाल्यास त्यावर दंड आणि गुन्हा दाखल केला तरच याला कुठे तरी मॉडीफाय वाहनधारकांच्या मनात जरब बसणार आहे.
-एक सातारकर.*
डॉल्बीची पद्धतच रूढ झालीय हे घातक*
गणेशोत्सव व इतर छोट्या-मोठ्या कार्यक्रमांतही डॉल्बी लावण्याची पद्धत रूढ होऊ लागली आहे. पोलिसांकडून काही वेळा जनआग्रहास्तव आवाजाच्या मर्यादा पाळण्याच्या अटीवर परवानगी दिली जाते. पण ही मर्यादा पाळली जात नाही, हे उघड सत्य आहे. हे चित्र बदलण्यासाठी डॉल्बी, लेझर प्रकाशझोत आणि एलईडी लाईटचा सार्वजनिक ठिकाणी वापर करण्याबाबत कठोर निर्बंध आणण्याची व यासाठी काही नियम घालून देण्याची गरज आहे. सरकारनं पुढाकार घेऊन याबाबत तातडीनं कार्यवाही करावी.
*-अनंत पाटील, सातारारोड.*
*गणेशोत्सव नियमांचे पालन करण्याबाबत मंडळांचे एकमत*
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणि ईद-ए-मिलाद या अनुषंगाने सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गणेशोत्सव मंडळ, पोलीस पाटील यांची संयुक्त बैठक अलंकार हॉल येथे सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पो.नि. निलेश तांबे यांनी घेतली. या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, तहसीलदार समीर यादव उपस्थित होते. यावेळी गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सवाचे सर्व नियमांचे पालन करण्याबाबत एकमत केले. सातारा तालुक्यातील संभाजीनगर, गोवे, काळोशी ही गावे डॉल्बीमुक्त राहतील असे ठरावही करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्याचे स्वागत निलेश तांबे यांनी केले.