अण्णाभाऊ साठे हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे आघाडीचे शिलेदार होते : प्रा.डॉ. शरद गायकवाड
मराठी भाषा मराठी साहित्य आणि मराठी संस्कृती च्या अस्तित्व आणि अस्मितेसाठी आयुष्यभर अण्णाभाऊ साठे यांनी संघर्ष केला
10 August, 2025
कोल्हापूर (जरंडेश्वर समाचार) मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे हा दृढनिश्चय हृदयाशी बाळगून प्राणपणाने संघर्ष करून १०६ हुतात्म्यांच्या त्या समर्पण आणि हौतात्म्यातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आहे. या संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अण्णाभाऊ साठे हे आघाडीचे शिलेदार होते असे प्रतिपादन अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे अभ्यासक व ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ. शरद गायकवाड यांनी केले.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ वी जयंती पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना कोल्हापूर जिल्हा शाखेच्या वतीने साजरी करण्यात आली. राजर्षी शाहू स्मारक भवन मध्ये डॉ. गायकवाड हे प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. मुंबई कोणाचीअर्थात मुंबई आमची यासारखे प्रभावशाली लोकनाट्य लिहून अण्णा भाऊ साठे यांनी लाखो मराठी बांधवां मध्ये आपल्या वाणी आणि लेखणीच्या माध्यमातून स्फूर्ती चेतविले. वाघाला नख आणि गरुडाला पंख जितके प्रिय आणि जितके अविभाज्य आहेत. तितकीच मुंबईही मराठी मुलखाला म्हणजेच महाराष्ट्राला एकजीव एकरूप आणि अविभाज्य असल्याचे अण्णाभाऊंनी शेकडो साहित्य कृतींच्या माध्यमातून त्याकाळी मराठी माणसांच्या गळी उतरवून मराठी भाषा मराठी साहित्य आणि मराठी संस्कृती च्या अस्तित्व आणि अस्मितेसाठी आयुष्यभर संघर्ष केला असे डॉ. शरद गायकवाड यांनी अनेक उदाहरणांच्या माध्यमातून सविस्तर मांडणी केली.
मराठवाडा मुक्ती संग्राम, गोवा मुक्ती संग्राम आणि दिव, दमन साठी अण्णाभाऊंनी केलेला संघर्ष महाराष्ट्र कधीही विसरू शकत नाही. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पँथर आर्मीचे अध्यक्ष संतोष आठवले होते. मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी सांगलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश कांबळे, सी पी आर चे डॉ. वरूण बाफना, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, रेंदाळचे कृष्णात जाधव, प्रेस क्लबचे अध्यक्ष दिगंबर कुलकर्णी, सतीश घाटगे, बार्टीचे किरण चौगुले, कोनवडेचे समाधान मोरे यांना गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाळासा-हेब साळवी, अनिल मिसाळ, बार्टी च्या आशा रावण उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे स्वागत मच्छिंद्र रुईकर, प्रास्ताविक डॉ. मतेश आवळे, सूत्रसंचालन सुनील सामंत व आभार अमोल कुरणे यांनी मानले. कार्यक्रमास पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.