कोरेगाव नगरपंचायतीने कोरेगाव शहरामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा व स्मारक उभारावे -सुरेश बोतालजी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार
नगरपंचायतीला एक वर्षापूर्वी अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या अनुषंगाने निवेदन सादर केले असून त्यास तात्काळ मंजुरी देण्यात यावे अन्यथा दि. १५ ते १६ ऑगस्ट रोजी कोरेगाव प्रांताधिकारी कार्यालयावर व सातारा जिल्हाधिकारी कार्यावर जनआंदोलन उभारणा
07 August, 2025
कोरेगाव दि.७(जरंडेश्वर समाचार):-कोरेगाव नगर पंचायतीने आझाद चौक येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा यासाठी कोरेगाव नगरपंचायतीला एक वर्षांपूर्वी भारतीय बहुजन सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने नगरपंचायतीला निवेदन सादर करण्यात आले होते परंतु कोरेगावच्या नगरपंचायतीने याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. जगतविख्यात साहित्यिक, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा कोरेगाव शहरामध्ये उभारण्यात यावा तसेच जागे संदर्भात काही अडचणी असतील तर त्यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांशी बोलावे, आम्ही त्यास काही जागा सुचूवू इच्छित आहे. जळगाव नाका, आझाद चौक, अण्णाभाऊ साठे नगर या ठिकाणी ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारू शकतात, याच अनुषंगाने अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळा समिती, नगर पंचायतीला निवेदन देणार असून त्यावर कारवाई न झाल्यास दि. 15,16 ऑगस्ट 2025 रोजी कोरेगाव प्रांताधिकारी ,सातारा जिल्हाधिकारी कार्यालयांवर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक समिती, व कोरेगाव तालुक्यातील मातंग समाजाच्या विविध संघटनेच्या वतीने धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात येईल, याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील, असा इशारा भारतीय बहुजन सेना व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे संस्थापक /अध्यक्ष सुरेश बोतालजी यांनी दिला आहे.
कोरेगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामाचा सपाटा विद्यमान आमदार महेश शिंदे यांनी लावला असून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा व स्मारक ते उभे करतील असा विश्वास स्मारक समितीला आहे म्हणून कोरेगावचे विद्यमान आमदार महेश शिंदे यांना स्मारक समितीच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ही आमची अस्मिता आहे अण्णाभाऊ साठे यांचे या महाराष्ट्रासाठी मोठे योगदान आहे, रशियाची राजधानी मॉस्को येथे अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. मॉस्कोतील रुडमिनो मार्गरेटा फॉरेन लँग्वेज स्टडीज या संस्थेनं अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभारला आहे. एक थोर समाजसुधारक, लोककवी, लोकशाहीर आणि जगद्विख्यात लेखक असून त्यांनी दलित आणि वंचितांच्या जीवनावर अनेक लेखन केले. त्यांच्या लेखनातून त्यांनी समाजातील अन्याय, विषमता आणि दारिद्र्य यांविरुद्ध आवाज उठवला. अण्णाभाऊ साठे यांनी कथा, कादंबऱ्या, लोकनाट्ये, नाटकं, पोवाडे, लावण्या, प्रवासवर्णने अशा विविध साहित्य प्रकारात लेखन केले आहे. त्यांनी जवळपास ३५ पुस्तके लिहिली आहेत. म्हणून अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा कोरेगाव शहरामध्ये उभारण्यात यावा अशी आमची मागणी आहे, कोरेगाव तालुक्यातील मातंग समाजाची ही ऐवढीच माफक अपेक्षा असून आमदार महोदयांनी ही मागणी मान्य करून कोरेगाव शहरांमध्ये भव्य दिव्य असा पुतळा व स्मारक उभे करावे अशी मागणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे संस्थापक /अध्यक्ष सुरेश बोतालजी यांनी केली आहे.