डॉल्बीच्या दणदणाटाला बसणार एसपींचा दणका..
गणेशोत्सव मंडळाची आज बैठक : डॉल्बी, लेझरबंदीचा होणार निर्णय*
08 August, 2025
सातारा (जरंडेश्वर समाचार) ज्ञानेश्वर भोईटे याच्याकडून:-पश्चिम महाराष्ट्रात डॉल्बीचा नादच खुळा. आज कोणतीही मिरवणूक म्हटलं की, दे दणादण डॉल्बी साऊंड आणि त्यावर थिरकणारी तरुणाई हे सर्रास चित्र आहे. त्यामुळे डॉल्बीसाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असणारे मंडळाचे कार्यकर्ते आता परजिल्ह्यातून डॉल्बी आणण्याचा परिपाठ दरवर्षीप्रमाणे यावर्षीही करताना दिसत आहे. या डॉल्बीमुळे अनेकांच्या कानांना बहिरेपणा येत आहे. तर लेसर लाईटने डोळ्यांना इजा होवू लागली आहे. याबाबत आता पेन्शनरांच्या साताऱ्यात गणेशोत्सवापूर्वीच सातारकरांनीच डॉल्बी विरोधात रणशिंग फुंकले आहे. सातारकरांच्या जनभावना विचारात घेवुन पोलीस अधिक्षक तुषार दोशी हे ही आता डॉल्बीचा दणदणाटाला दणका देणारच आहेत. एकूणच डॉल्बीचा दणदणाट थांबविण्यासाठी एसपींनी नियोजनबध्द केलेल्या उपाययोजना पाहता आतापर्यंतच्या एसपींना ते भारीच ठरतील, अशी अपेक्षा यानिमित्ताने सातारकरांमधून व्यक्त होत आहे.
सातारा शहरात राजपथ येथे २0१४ मधील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्यावेळी डॉल्बीच्या या दणदणाटाने मध्यरात्री भिंत कोसळली. यामध्ये बोलेमामांचा वडापाव सुरु होता. त्यामध्ये त्यांच्यासह तिघेजण या भिंतीखाली गाडल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी समाजमाध्यमांतून उमटलेल्या सुराने पोलीस यंत्रणा सतर्क झाल्यामुळे त्यापुढील मिरवणुका काही नियमांवलीच्या चाकोरीत आल्या. तर गतवर्षी महाबळेश्वर येथे तर विविध डॉल्बीच्या दणदणाटामुळे झालेल्या शॉर्टसर्किटमध्ये जनरेटर पेटला. यामध्ये काहीजण या आगीत होरपळत असताना डॉल्बीच्या या आवाजावर तरुणाईची पावले थिरकू लागली. अखेर याची जाणीव सर्वांनाच झाल्यानंतर आता यापुढे डॉल्बी वाजलीच जावू नये, असा एकमुखी निर्णय घेण्यात आला.
गतवर्षी २0२४ मध्ये अक्षय तृतीया दिवशी छ. शिवाजी महाराज जयंती मिरवणुका वाई शहरातील किसन वीर चौक येथे एकत्र आल्या, तेव्हा त्या ईर्षेपोटी तू...तू...मैं...मैं...च्या वरच्या स्वरात वाजल्या. अन त्याचवेळी दुचाकीवरुन जाणाऱ्या हेमंत दिलीप करंजे वय ३८ या युवकाच्या हृदयाचा घाव या डॉल्बीने घेतला अन् त्याचा मृत्यू झाला. कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे येथेही गतवर्षी एका मंगलकार्यालयात एकाच गावात दोन वेगवगळ्या डॉल्बी येणार होत्या. त्याचवेळी दोघांनीही इर्षापोटी तुझ्यापेक्षा माझ्या डॉल्बीला मागणी असताना तुलाच का बोलवलं जातं तुझ्यापेक्षा माझ्या डॉल्बीचा आवाज दणदणाट आहे. पहायच का? असा सूर आळवत दोन्ही डॉल्बीमध्ये तू..तू..मैं..मै.. झाली. अन पुढे पिंपोडे बुद्रुक येथून तडवळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या माळावरच या डॉल्बीची धुण त्यांच्या स्टाईलने सुरु झाली. अखेर ही बाब तेथीलच संबंधित मंगल कार्यालय मालकाला समजल्यानंतर त्याच्या मध्यस्थीनंतर दोघेही निघून गेले.
आता वादाचे कारण दोन डॉल्बीच्या इर्षेचे ठरल्यानंतर या ईषापोटी साताऱ्यातील अशियाई महार्गावर लिंबखिंड येथील गौरीशंकर कॉलेज समोर पुढील चार दिवसांनी पुन्हा या दोन्ही डॉल्बी दणादणली. या डॉल्बीचा आवाज एवढा मोठा होता की, या महामार्गावरुन जाणाऱ्या विविध वाहनांच्या काचाही भूकंपापेक्षाही अधिक वेगाने थरथरु लागल्या होत्या. या दोन्ही डॉल्बीच्या आवाजाने बेभानपणे नाचणाऱ्या तरुणाईने इर्षेपोटी नाचत असताना या तरुणाईने कोयते हातात घेत एकमेकांसमोर हातवारे करत उगारत नंगानाच केला. हे कमी की काय? म्हणून या डॉल्बीच्या तालावर नाचणाऱ्या दोन तीन युवकांनी तर डॉल्बी गाडीवर चढत पिस्तुलही नाचवले. हे दृश्य पाहणारे हा साताराच की बिहार असा सवाल करत वाहनधारक मार्गस्थ होत होते. दरम्यान, तत्कालीन पोनि विश्वजीत घोडके, पोलिस उपनिरीक्षक रोहित फर्णे हे पोलिसांच्या लवाजम्यासह घटनास्थळी दाखल होवून काही वेळापूर्वी डॉल्बीवर पोलीसवाल्या... सायकलवाल्या बिरेक लावून थांब.. ही सुरु असलेली धून पोलिस गाडीच्या ब्रेकने थांबली त्यानंतर तरुणाईने धूम या हिंदी चित्रपटातील गाड्यांप्रमाणे एकेकजण भुर्रकन गाड्या पळवू लागली. त्यापैकी सहा जणांना पकडत डॉल्बीची वरात गौरीशंकर कॉलेजसमोरुन सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या दारात आणली होती.
एकूणच सातारा, कोरेगाव, वाई, महाबळेश्वर येथील डॉल्बीच्या आवाजाने अनेक कुटुंबांची झालेली हानी पाहता आता डॉल्बीच्या भिंती गाढण्याचे पोलिसांनी गांभीर्याने घेतले आहे. यामुळे आता डॉल्बी शासननियमांची मर्यादा ओलांडताच थेट कारवाई करण्याचे तोंडी आदेश पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांनी दिले आहेत. डॉल्बी नियबबाह्य वाजवणाऱ्या विरोधात एसपींच्या धडाकेबाज या भूमिकांचे सातारकरांसह संपूर्ण जिल्हावासियांमधून स्वागत करण्यात येत आहे.
पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांनी डॉल्बी प्रदूषण रोखण्यासाठी चांगली व्युहरचना केली आहे. आतापर्यंत एसपींची एंट्री झाल्यापासून ते खमक्या अधिकारी आहेत का? याबाबत उलट- सुलट चर्चा होत होत्या. पण डॉल्बीचा दणदणाट थांबविण्यासाठी गणेश आगमन सोहळ्याला याचा हिसका दिसणार आहे. एसपीसाहेब आता बेकायदेशीर काहीही खपवून घेणार नाहीत. एकूणच केलेल्या उपाययोजना पाहता एसपी तुषार दोशी हे आतापर्यंतच्या एसपींना भारीच ठरतील,असंही यानिमित्ताने सातारकरांमधून बोलले जात आहे.
*कार्यकर्ता कोणताही असो कारवाई होणारच*
गणेशोत्सवाच्या आगमनाला किंवा गणेशोत्सव विसर्जनादरम्यान डॉल्बी वाजवताना शासन नियम निकषांचे पालन करणे गरजेचे आहे. याबाबत कोणत्याही मंडळांनी या नियमांचे उल्लंघन केले तर तात्काळ तेथील डॉल्बीच्या आवाजाचे रेकॉर्डिंग करुन प्रदूषण मंडळाच्या अहवालानंतर कारवाई ही कोणत्याही स्थितीत होणारच. हे मंडळ भलं मग कोणत्याही लोकप्रतिनिधींच्या कार्यकर्त्यांचे असो, कारवाईही होणारच आहे. -तुषार दोशी, पोलीस अधिक्षक सातारा.*
*डॉल्बीविरोधात हरित लवादात*
गणेशोत्सव असो की दुर्गाउत्सव, दहीहंडी किंवा कोणत्याही मंगल कार्यात आता डॉल्बीचा थाट वाढू लागला आहे. पण हा आज अनेकांच्या जीवावर बेतला असल्याचे २0१४ पासून पाहिले तर सर्वांनाच लक्षात येत आहे. पण उमगलं जात नाही. त्यामुळे आता डॉल्बीबंदीसाठी हरित लवादात दोन दिवसांत प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल करणार आहे.-सुशांत मोरे, सामाजिक कार्यकर्ते, सातारा.*
*गणेशोत्सव मंडळांची आज शुक्रवारी बैठक*
गणेशोत्सवाच्या संदर्भाने सातारा जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांची व जिल्हा प्रशासनाची जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवार, दि. ८ रोजी बैठक घेण्यात येणार आहे. डॉल्बी लेझर लाईटसच्या संदर्भाने निश्चित धोरण घेवून गणेशोत्सव काळातील अडीअडचींवर या संदर्भाने चर्चा होईल. -शंभुराज देसाई, पालकमंत्री सातारा.
*मोठा आवाज! नको रे नको!सातारकर, डॉक्टर्स म्हणतात, डॉल्बीचे दुष्परिणामच!!
डीजे, डॉल्बी साऊंड सिस्टिमचा दणदणाट काही युवकांचा जल्लोष वाढवणारा असला तरीही समाजासाठी ते 'दुखणं'ह आहे. वयस्करांसाठी 'ताप'च आहे, तर आजारग्रस्तांसाठी 'मृत्यू-यातनां'चे व्दारच ठरणाऱ्या या आवाजाच्या भिंती आहेत. काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या मोठ्या आवाजाला सर्वच स्तरातून 'नको रे नको' असेच बोलून त्याला विरोध आहे. सातारकर, डॉक्टर्स, तत्ज्ञांना डॉल्बी, डीजे साऊंड सिस्टिमचे दुष्परिणाम माहिती आहेत. याची दखल पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पोलीस अधीक्षक तुषार दोषी व जिल्हा प्रशासनाने घ्यावी आणि त्यावर यंदाच्या गणेशोत्सवात बंदीच घालावी.
मोठ्या आवाजाचा थेट हृदयावर परिणाम होताच, असे नाही. मात्र, मोठ्या आवाजामुळे टेन्शन येवून हार्ट रेट, बीपी वाढू शकतो. त्याचे परिणाम काही वेळा स्ट्रोक येणे, हार्ट ॲटॅक येणे यात होतात. स्ट्रोक व्हॅल्यूम वाढल्याने ब्लडप्रेशर वाढतो. हृदयविकारग्रस्त आहेत, त्यांनी काळजी घ्यावी.-डॉ. कौशिक पाटील हृदयविकार तत्ज्ञ, सातारा.*
गर्भवतीच्या हृदयाचे ठोके वाढून बाळाच्या हृदयाचेही ठोके वाढण्याची शक्यता असते. गर्भातील पाण्यामुळे गर्भास २० टक्केच आवाज जात असला तरीही मोठ्या आवाजाचा बाळाच्या कानाच्या नाजूक पडद्यांवर दुष्परिणाम होतात. गर्भवती महिला मानसिकरीत्या संवेदनशील असते. अति मोठ्या आवाजामुळे तिची मानसिक स्थिती बिघडू शकते. कदाचित वेळेपूर्वीच प्रसूतीही होवू शकते. गर्भवतीच्या मेंदूत रक्तस्त्राव होवू शकतो. त्यामुळे गर्भवतींनी काळजी घ्यावी.-डॉ. स्नेहल माने-जगताप महिला व प्रसूती तत्ज्ञ, सातारा.*
अतिमोठ्या आवाजामुळे कानाच्या कॉकलियामधील हेअर सेल्स डॅमेज होतात. ते एकदा डॅमेज झाले की पुर्ववत होत नाही. त्यामुळे ऐकण्यास कमी येते. असा श्रवणदोष भरुन न येणारा आहे. कानातून आवाज येणे, अचानक ऐकण्यास न येणे असे श्रवणदोष सुरु होतात. हे विशेषत: तरुण वर्गात जास्त प्रमाण आहे. ते डॉल्बी, डीजेच्या जवळ नाचत असतात. त्याचे हे दुष्परिणाम आहेत. -डॉ. संकेत प्रभुणे कान, नाक, घसा तत्ज्ञ, सातारा.*
एका मर्यादेपेक्षा जास्त आवाजामुळे वयोवृध्द लोकांमध्ये चिडचिड वाढते. झोप येत नाही. बेडवरील रुग्णांसाठी तसेच विस्मरणाचा आजार असलेल्या वयोवृध्द लोकांचे मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता असते. साताऱ्यातील ज्येष्ठ नागरिक संघाने डॉल्बी साऊंड सिस्टिमवर बंदी घालण्याची मागणी केली असून, ती महत्वाची आहे. समाजाने आरोग्याचा विचार करुन सण, समारंभ साजरे करावेत-डॉ. हमीद दाभोलकर मानसोपचार तत्ज्ञ, सातारा.
सातारा शहरात हल्ली मोठ्या आवाजात सर्रासपणे डॉल्बी साऊंड सिस्टिम लावल्या जातात. काही ठिकाणी तर दोन डॉल्बी साऊंड सिस्टिमवाल्यांमध्ये आवाजाची स्पर्धाच लागलेली असते. यामुळे कानठळ्य बसून ज्येष्ठ नागरिकांच्या प्रकृती बिघडतात. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी याविरोधात ठेास निर्णय घ्यावा. डॉल्बी साऊंड सिस्टिम नकोच.*-ज्येष्ठ नागरिक संघटना, सातारा.*
डॉल्बी साऊंड सिस्टिमचा आवाज हा सर्वांनाच त्रासदायक आहे. माणसांच्या हृदयाची धडधड वाढते. कानाचे त्रासही होतात. प्रत्येक घरात वयस्कर, आजारी व्यक्ती असतात. त्यांच्यावर दुष्परिणाम होतात. हॉस्पिटल शेजारुन जातानाही ही सिस्टिम बंद होत नसते. डॉल्बीला आमचा विरोधच आहे. त्याऐवजी पारंपारिक वाद्ये वाजवावीत.-नंदकुमार चोरगे नागरिक, सातारा.*
..................................
डीजे साऊंड सिस्टिमचे वयस्कर, आजारग्रस्त लोकांवर दुष्परिणाम सातत्याने होत असतात. गणेशोत्सव असो की कोणतेही सण, समारंभ, वाढदिवस यावेळी मोठ्या आवाजात डॉल्बीचा वापर होत असतो. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनाने डॉल्बीवर कायम स्वरुपी बंदीच घालावी. लोकांचे आरोग्य जोपासून सण, समारंभ, उत्सव साजरे व्हावेत.
*-सुनील जगताप नागरिक, सातारा.*