single-post

सावधान..! आपण बिबट्याचा वावर असणाऱ्या क्षेत्रात आहात, आपण घ्यावयाची दक्षता-महादेव हजारे वनपरिक्षेत्र अधिकारी वाई

वन्यप्राण्यांवर प्रेम करा, ते आपले शत्रू नाहीत. वन्यजीव राष्ट्रीय जीव संपती आहे. बिबट्या हा वन्य प्राणी भारतात मोठ्या प्रमाणात आपल्या भागात आढळत असल्याने सातारा जिल्ह्यामध्ये सर्वत्र त्याचा वावर आहे.

07 August, 2025

वाई दि.७(जरंडेश्वर समाचार):-वन्यप्राण्यांवर प्रेम करा, ते आपले शत्रू नाहीत. वन्यजीव राष्ट्रीय जीव संपती आहे. बिबट्या हा वन्य प्राणी भारतात मोठ्या प्रमाणात आपल्या भागात आढळत असल्याने सातारा जिल्ह्यामध्ये सर्वत्र त्याचा वावर आहे. वाई तालुक्यात बिबट्या व इतर प्राणी आढळल्यास त्याचे संवर्धन व संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे, याची जाणीव मनात ठेवा, तसेच त्यांच्या पायाचे ठसे आढळल्यास वाय वनपरिक्षेत्र कार्यालय येथे संपर्क करावा असे जाहीर आवाहन महाराष्ट्र राज्य उपवनसंरक्षक सातारा वनविभाग सातारा व वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव हजारे यांनी केले आहे.

वाई तालुक्यातील काही भाग डोंगराळ असल्यामुळे अशा ठिकाणी वन्यजीव असण्याची शक्यता असते त्यामुळे कोणास बिबट्या आढळल्यास आपण वनपरिक्षेत्र कार्यालयातील वनक्षेत्रपाल, वाई. मो. ०२२२२०६२३, वनपाल, वाई मो. ८१४९२५६३९३ वनपाल व्याहाळी मो. १९९२१९२५३१ वनपाल भुईज मो. ९८९०७५५९४० यावर दूरध्वनी द्वारे संपर्क साधावा असे आवहान वाई तालुक्यातील नागरिकांना करीत आहोत.

वन्य प्राण्यापासून आपण स्वतःची काळजी कशी घ्यावी, कामानिमित्त वाडी वस्ती ते शेत त्याच प्रमाणे शालेय विद्यार्थी यांचे घरापासून शाळेत जा ये करताना शक्यतो समुहाने जाये. विविध जत्रा-यात्रा-उरुस हंगाम या कालावधीत वाडी यस्ती वरून रात्रीच्या वेळी घरी जाताना विशेष काळजी घ्यावी. शेतात वाकून काम करताना बिबट्याने पाठीमागून हल्ला करण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे ग्रामस्थांनी याबाबत विशेष दक्ष रहावे.

 बिबट्याने मनुष्यप्राण्यावर किंवा आपले पशुधनांवर हल्ला केल्यास त्याबाबतची माहिती तात्काळ वनपरिक्षेत्र कार्यालयास द्यावी. संध्याकाळच्या वेळेस राहत्या घराच्या अंगणात किंवा परिसरामध्ये लहान मुलांना एकटे सोडू नये. घडलेल्या घटनांमध्ये लहान मुले/स्त्रिया यांच्या बाबत रात्रीचे वेळेस संघर्ष झालेल्या आहेत. तरी त्याबाबत विशेष दक्षता घ्यावी. अंगणात परिसरात विजेचा दिवा चालू ठेवावा. शक्यतो त्यावेळेस अंगणात शेकोटी पेटती ठेवावी. कामावर किंवा घराबाहेर जाताना लहान मुलांचे सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाय योजना कराव्यात. आपल्या पशुधनाची रात्रीच्या वेळी गोठ्यात बांधनी करताना गोठा सर्व बाजुंनी बंदिस्त राहील याची दक्षता घ्यावी. गुराख्यांनी आपली गुरे चारायला घेऊन जाताना जमावाने जावे. गावापासून दूर तसेच यनांचे खूप जवळ गुरे चारायला घेवून जावू नयेत.  बिबट्याचे संदर्भात प्राप्त होणाऱ्या चुकीच्या बातम्या, अफवा पसरवू नयेत व त्यापासून दूर रहावे. सायंकाळी व रात्री अनावधानाने देखील एकट्याने बाहेर पडू नये. सोबतीने किंवा समुहाने वावरावे. मोबाईल अथवा रेडिओवर गाणी चालू ठेवून, शक्यतो घुंगराची काठी जवळ बाळगून सहकाऱ्याबरोबर शेतास पाणी द्यावे, रात्रीच्यावेळी हे अत्यंत आवश्यक आहे. कधीही बिबट्याचा पाठलाग करू नये. कारण तो घाबरून उलटा हल्ला करू शकतो. बिबट्या समोर आल्यास जोरात आरडा ओरडा करावा. खाली वाकू नये किंवा ओनवे झोपू नये. रात्री उघड्यावर झोपू नये.गावाजवळ मोकाट कुत्रे, बकऱ्या व डुकरे यांची संख्या कमी करणे. आपल्या हिताचे आहे.

 कोणत्याही प्रकारे बिबट्याला जखमी करू नये. जखमी बिबट्या अधिक धोकादायक बनू शकतो. आपण नेहमी दक्ष असावी तसे या पद्धतीने काळजी घेतल्यास आपला वन्य जीवापासून संरक्षण होऊ शकते तसेच अनावधानाने काही झाल्यास किंवा आपले नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळवून देण्यास वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी कटिबद्ध आहे  व आपले  जीविताचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे.

- वन परिक्षेत्र अधिकारी वाई