खंडाळा तालुका शिष्यवृत्तीत ठरेल राज्यात अव्वल-गटशिक्षणाधिकारी गजानन आडे
खंडाळा शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
04 August, 2025
खंडाळा, दि. ४ : तालुक्याची शिष्यवृत्तीची परंपरा उज्ज्वल आहे. गेल्यावर्षीचा निकाल पाहता यात लक्षणीय वाढ झाली आहे. यावर्षी जास्तीतजास्त विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक होण्यासाठी आत्तापासूनच तयारी सुरू आहे. त्यासाठी भविष्यात खंडाळा तालुका हा जिल्ह्याबरोबर राज्यात अव्वल ठरेल, असा विश्वास गटशिक्षणाधिकारी गजानन आडे यांनी यावेळी व्यक्त केला.
ते पंचायत समिती शिक्षण विभाग व नवनीत फाउंडेशन संयुक्त विद्यमाने येथील किसन वीर सभागृहात आयोजित शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळेत बोलत होते. गणिताचे तज्ज्ञ मार्गदर्शक खंडाळा तालुका शिष्यवृत्ती वर्गात बोलताना गजानन आडे. त्या वेळी तज्ज्ञ मार्गदर्शक.म्हणून माचुतरचे (ता. महाबळेश्वर) केंद्रप्रमुख नामदेव धनावडे, बुद्धिमत्ता विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून भोगवली मुरा (ता. जावळी) शाळेचे शिक्षक शामराव जुनघरे, मराठीचे तज्ज्ञ म्हणून आसनी (जावळीशाळेचे संपत शेलार उपस्थित होते, तर केंद्रप्रमुख सुभाष ढालपे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, तालुका शिष्यवृत्ती गटाचे प्रमुख पंकज रासकर, दास लोखंडे, भानुदास राऊत, नवनीत फाउंडेशनचे संतोष जगताप, नारायण बर्गे व रोहित सावंत, शिष्यवृत्ती वर्गाला शिकविणारे शिक्षक यावेळी उपस्थित होते.
या शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गात तिन्ही विषयांतील विविध कृल्प्त्या, सूत्रे, बारकावे, वेळेचे नियोजन, सराव परीक्षा, हस्तपुस्तिका, अभ्यासक्रमाचे स्वरूप, वर्षभराचे नियोजन कसे करावे, जादा तास व इतर शिष्यवृत्तीबाबततज्ज्ञ मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले. यावेळी वर्गशिक्षकांनी शंका व मुलांना घडविताना येणाऱ्या अडचणींबाबत प्रश्न उपस्थित केले.
खंडाळा शिष्यवृत्ती पॅटर्न प्रसिद्ध आहे. नियोजन, सातत्य व सराव याचा अवलंब केल्यास निश्चितच विद्यार्थी यशस्वी होतील. यावर्षी तालुक्यातील पात्र विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढली आहे. चालू शैक्षणिक वर्षात यात अधिक वाढ होण्यासाठी प्रयत्न व्हावेत, यासाठी सर्वांनी आतापासून सुरुवात करायला हवी, अशी अपेक्षा गटशिक्षणाधिकारी श्री. आडे यांनी व्यक्त केली. दास लोखंडे यांनी आभार मानले.