वाई तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ ३ शेळ्या ठार
नागरिकांनी वाई वनविभागाशी संपर्क साधावा-महादेव हजारे वनपरिक्षेत्र अधिकारी
07 August, 2025
वाई दि..७ (जरंडेश्वर समाचार)अक्षराज दिलीप कांबळे यांच्या कडून:- : वाई तालुक्यातील दुर्गम डोंगराळ विठ्ठलवाडी कुसगाव येथे शनिवारी बिबट्याने वस्तीत घुसून गोठ्यात बांधलेल्या ३ शेळ्या ठार केल्या. येथील शेतकरी संपत गणपत गोळे यांच्या घराशेजारील गोठ्यात बांधलेल्या ३ शेळ्यावर बिबट्याने हल्ला करून ठार मारल्या. यापूर्वी भगवान सखाराम पाटणे, बाळू गोळे, दत्तात्रय निकम व नवनाथ पाटणे यांच्या शेळ्या व पाळलेले कुत्रे ठार केले होते. या घटनेची माहिती वनविभागाला कळवली असता खात्याने फारशी दखल घेतली नव्हती. वाई तालुक्याच्या पश्चिम जोर जांभळी खोरे हे घनदाट झाडी व डोंगराळ भाग असल्याने बिबट्याला लपण्यासाठी सुरक्षित जागा आहे त्यामुळे या परिसरात बिबट्याचा वावर व हल्ले वाढली आहेत. याआधी बोरगाव येथील वस्तीत घुसून दारात बांधलेल्या कुत्र्यावर हल्ला करून त्याला ठार मारले होते. नागेवाडी येथील शेतकरी गुरे चारण्यास रानात गेले असता, बरोबर असलेल्या २ कुत्र्यांचा फडशा बिबट्याने पाडला होता. बिबट्याचे लक्ष शेळ्या मेंढ्या व कुत्र्यावर असून अशा प्राण्यांच्या शोधात बिबट्या नागरी वस्तीपर्यंत येतो, भागातील मांढरदेव घाट, भोर घाट, वेरूळी, जोर खोऱ्यातील व जांभळी खोऱ्यातील गावातील रहिवाशांना बिबट्याचे दर्शन घडते असते, नागरिक तातडीने वनविभागाला कळवतात. मात्र वन खात्याकडून फारशी दखल घेतली जात नाही अशा ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. बिबट्याच्या भीतीने गुराखी व शेतात कामासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने घटनास्थळी जाऊन त्या परिसरातील ग्रामस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मार्गदर्शन करून ठोस पावले उचलावी व नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी जनतेतून होत आहे. महादेव हजारे वनपरिक्षेत्र अधिकारी वाई यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की बिबट्याचा आम्ही बंदोबस्त करू तसेच कोणाचे नुकसान झाले असल्यास शासनाकडे प्रस्ताव पाठवला जाईल, नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न केला जाईल.असे वाई वनविभागाचे अधिकारी महादेव हजारे यांनी म्हटले आहे नागरिकांनी वाई वनविभागाशी संपर्क साधावा.