निवृत्तीच्या दिवशी सफाई कामगार महिलेला मुख्याधिकारी यांनी स्वतःच्या खुर्चीवर बसून केला सन्मान
फलटण नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांकडून अनोखा सन्मान
06 August, 2025
फलटण (जरंडेश्वर समाचार): फलटण नगर परिषद ची महिला सफाई कामगार माया काकडे यांच्या रिटायरमेंटच्या दिवशी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांनी स्वतःच्या खुर्चीवर बसून सफाई कामगार महिलेचा अनोखा सन्मान केला या त्यांच्या कार्याचे कौतुक सातारा जिल्ह्यामध्ये सर्वत्र होत आहे.
गेले अनेक वर्षांपासून माया काकडे या सफाई कामगार महिला फलटण नगर परिषदेच्या माध्यमातून सफाई करण्याचे काम करत होत्या, त्या निवृत्त होणार आहेत, यांच्यासाठी तो केवळ भावूकच नाहीतर संस्मरणीय क्षण ठरला. निवृत्तीच्या दिवशी आपल्या या सहकाऱ्यास मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी निरोपाच्या सोहळ्यावेळी चक्क स्वतःच्या खुर्चीवर बसवत त्यांना तो सर्वोच्च मान दिला. त्यांच्या या कृतीने केवळ काकडे याच नाहीतर सगळाच कर्मचारी वर्ग भारवून गेला. माणुसकीचे दर्शन घडवणारा मुख्य अधिकारी म्हणून निखिल मोरे यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे या त्यांच्या कार्याबद्दल फलटणकर यांच्या नजरेत एक चांगला अधिकारी म्हणून माणुसकी असणारा अधिकारी स्मरणात राहील.
नगर परिषद चे सफाई कामगार म्हटले, की शहर जागे होण्यापूर्वी खूप कष्ट आणि वेदना सहन करत रस्ते स्वच्छ करणे तसेच त्या परिसरातील स्वच्छता ठेवणे चे काम खऱ्या अर्थाने या सफाई महिला कामगार करीत असतात, स्वच्छतेचे हे काम करणाऱ्या व्यक्तींनाही समाज वेगळ्या नजरेने काही वेळा पाहत असतो, तर अनेकदा त्यांचा सन्मानही होतो. फलटण आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या माया काकडे २२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाल्या. त्यांच्या निरोप समारंभासाठी त्या आपल्या कुटुंबासह मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या दालनात आल्या होत्या. त्या वेळी मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी एक अभूतपूर्व निर्णय घेतला. त्यांनी माया काकडे यांना हा निरोपाचा सोहळा होईपर्यंत स्वतःची खुर्ची देऊन मानाचे आसन दिले. या अनोख्या सन्मानाने मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसलेल्या माया काकडे यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
आतापर्यंत फलटण पालिकेच्या इतिहासात कोणत्याही सफाई कर्मचाऱ्याचा अशा प्रकारे सन्मान झाला नव्हता. मुख्याधिकारी मोरे यांची ही कृती केवळ एका कर्मचाऱ्याचा सन्मान नसून, सर्व कामगार वर्गाप्रति असलेली कृतज्ञता, आदर आणि आपुलकीचे प्रतीक ठरली. या समारंभाला माया काकडे यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. माया काकडे याही या सन्मानाने भावुक झाल्या. त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना हात जोडून पालिकेप्रति ऋण व्यक्त केले. अशा प्रकारचे मुख्याधिकारी महाराष्ट्रामध्ये निर्माण व्हावेत हीच अपेक्षा फलटणकरांनी व्यक्त केली.
सफाई कर्मचारी म्हणून काम करताना खूप कष्ट असतात. तरीही पूर्ण निष्ठेने कर्मचारी आपली सेवा बजावतात. २२ वर्षे सेवा पूर्ण करून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याच्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे, हाच या कृती मागचा उद्देश होता. निखिल मोरे, मुख्याधिकारी, फलटण