कराड प्रीतीसंगम नदी परिसरामध्ये मगरीच्या सततच्या दर्शनामुळे नागरिकांनी व मासेमारी करणाऱ्या लोकांनी सावधगिरी बाळगावी
कराडच्या प्रीतिसंगमावर मगरीची दहशत कायम; सावधगिरी बाळगण्याचे आवाहन
05 August, 2025
कराड (जरंडेश्वर समाचार) : कराड कोयना नदी जुना व नवीन पूल, कोयनेश्वर मंदिर व प्रीतिसंगम या परिसरामध्ये अनेकवेळानागरिकांना मगर दिसत असून नदीकाठी व नदी परिसरामध्ये मगरीच्या सततच्या दर्शनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
कराड येथील प्रीतिसंगम नदीकाठी परिसरात कोयना नदीच्या प्रवाहात पश्चिमेकडील नदीकाठावर सोमवारी मगरीचे दर्शन झाल्यामुळे नागरिकांच्या मध्ये उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. सकाळी प्राणिमित्र सुरेश पवार यांनी ड्रोनच्या साहाय्याने केलेल्या चित्रीकरणामध्ये ही मगर नदीच्या प्रवाहात तरंगत विश्रांती घेत असल्याचे स्पष्ट दृश्य टिपले गेले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोयना नदीवरील जुना व नवीन पूल, तसेच कोयनेश्वर मंदिर आणि प्रीतिसंगम बाग परिसरात वारंवार मगरीच्या होणाऱ्या सततच्या दर्शनामुळे नदीत पोहायला येणाऱ्या नागरिकांसह मासेमारी करणाऱ्यां लोकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रीतिसंगमाकडे दररोज हजारो पर्यटक, भाविक आणि स्थानिक नागरिक भेट देत असतात. नदीकाठी परिसरातील अल्हाददायक मोकळं वातावरण याचा मनमुराद आनंद पर्यटक घेत असतात मात्र, नदीत मगरीचे वास्तव्य स्पष्टपणे आढळल्याने या परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या मगरीला कराड वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांनी या मगरीचा बंदोबस्त करावा अशी मागणी पर्यटक व नागरिकांच्या मधून होत आहे. मगर पकडून अन्यत्र सुरक्षितपणे तात्काळ वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांनी सोडण्यात यावे, अशी मागणी करार शहरवासीयांच्या वतीने करण्यात येत आहे. दरम्यान, मगरीचा वावर नदी व नदीकाठी परिसरात असल्यामुळे, नागरिकांनी याचा धोका लक्षात घेऊन स्वतःची सुरक्षा करावी तसेच नागरिकांनी नदीत पात्रात उतरणे, पोहणे, मासेमारी करणे टाळावे, अन्यथा हकनाक जीव गमवण्याचा धोका ओढावून घेऊ नये,तसेच वन विभाग आणि पालिका प्रशासनाने नागरिकांना नदीकाठी जाताना सावधगिरी बाळगण्याचे सुरक्षा फलक परिसरात लावले असून, तसे सूचना फलकही लावण्यात आले आहेत.दरम्यान, कृष्णा- कोयना नद्यांमध्ये अलीकडच्या काळात मगर आढळण्याचे प्रमाणात सतत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे यापूर्वी कराड लागत वारुंजी, कृष्णा- कोयना नद्यांचा प्रीतीसंगम, नवीन व जुना कोयना पूल यासह कार्वे, रेठरे पुलाखाली व परिसरात मगरींचे दर्शन घडले आहे. यावर वनखात्याने त्याची दाखल घेवून योग्य त्या उपाययोजना करताना, लोकांना काय खबरदारी घ्यायच्या याचे प्रबोधनही केले आहे. तसे आवाहन केले आहे.
अभ्यासकांच्या मते कृष्णा- कोयना नद्यां हे मगरीचे अधिवास क्षेत्र आहे. खरेतर, त्यांचा अधिवास लोकांना भीतीचा वाटू नये. कारण मगरींनी त्यांचा अधिवास परिसर सोडून जायचे कुठे असा प्रश्न आहे. मगरींचे दर्शन झाल्याचे त्याची माहिती संबंधित वन विभागाला देण्यासह कमालीची दक्षता गरजेचे असते. परंतु, मगरी दिसली कि त्यांची विनाकारण भीतीदायक चर्चा होते. परंतु, अशावेळी वन विभागांच्या सूचनांचे पालन हेच अतिशय महत्वाचे आहे. तसे मार्गदर्शन व आवाहन वेळोवेळी वन विभाग करीत असते. वनविभागाने नागरिकांच्या सुरक्षे च्या दृष्टीने अजून काही उपाययोजना करता येतात का? ते पाहणे खूप गरजेचे आहे तसेच या नदीकाठी परिसरात वन विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी गस्त घालावी अशी नागरिकांची मागणी होत आहे.