single-post

बसपाकडून वाजत-गाजत साहित्यरतन अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी

सामाजिक न्यायासाठी वैचारिक क्रांतीच पर्याय; डॉ.हुलगेश चलवादींचे प्रतिपादन

01 August, 2025

पुणे दि.१ :-लोकशाहीरांच्या क्रांतीकारी, पुरोगामी विचारांवर चालत बहुजन समाज पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसह इतर निवडणुकांमध्ये यश मिळवेल. 'सर्वजन सुखाय,सर्वजन हिताय' समाजव्यवस्थेसाठी बहुजनांची 'शासनकर्ती' जमात उभारण्याकरीता बसप प्रयत्नरत आहे. समाजाच्या व्यथा-व्यंगांना शब्दांनी जखमांसारखे भिडवणारे क्रांतीचे कवि अण्णाभाऊंच्या लोकसाहित्यातून पक्षाला प्रेरणा मिळते,असे प्रतिपादन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अॅड.सुनील डोंगरे यांनी केले.

अॅड.डोंगरे यांच्या हस्ते तसेच पक्षाचे राज्य प्रभारी रामचंद्रजी जाधव,प्रदेश महासचिव, पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांच्या उपस्थितीत पुण्यातील येरवडा येथील अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनात अण्णाभाऊंच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करीत अभिवादन करण्यात आले.तदनंतर वाजत गाजत सारसबाग येथील अण्णाभाऊंच्या ऐतिहासिक पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, बामसेफ समन्वयक अशोक रामटेके, सागर जगताप, अनिल त्रिपाठी, परशुराम आरोने, राम डावकर, मनोज कसबे तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व प्रभारी, विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.पुण्यातील कार्यक्रमानंतर पक्षाकडून काढण्यात आलेली रॅली लोकशाहीरांचे मुळगाव वाटेगाव येथे आयोजित राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे जयंती सोहळ्यासाठी रवाना झाली.

अण्णाभाऊंच्या 'जग बदल घालूनी घाव, सांगुनी गेले मला भीमराव' या ओळीप्रमाणे सध्यस्थितीत सामाजिक न्याय तसेच देश बदलण्यासाठी 'घाव' अर्थात वैचारिक क्रांती करावी लागेल.बहुजनांच्या एकजुटीने प्रस्थापितांना घरचा रस्ता दाखवला जावू शकतो.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बहुजनांनी त्यामुळे हत्ती निवडणूक चिन्ह असलेल्या बसपाच्या निळ्या झेंड्याखाली एकत्रित यावे, असे आवाहन यानिमित्ताने डॉ.हुलगेश चलवादी यांनी केले. सामाजिक-राजकीय वैचारिक लढ्यातुन समाजबदलाची मुहूर्तमेढ रोवली जाईल,असा विश्वास त्यांनी त्यांनी व्यक्त केला.

''साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या लेखणीतून बहुजनांना उच्च शिक्षण घेवून संघटीत होण्याचा संदेश दिला. अण्णांच्या क्रांतीकारी शब्दांनी बहुजनांमध्ये ऊर्जा निर्माण केली. आजही लोकशाहीरांचे क्रांतीकारी शब्द प्रेरणा देणारे आहेत.याच प्रेरणेतून बहुजनांनी आत्मप्रकाशित होत सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, साहित्यीक तसेच राजकीय प्रगती करावी.बहुजनांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठीच बसपाचा जन्म झाला आहे.''